हायलाइट्स:

  • आंतरजातीय विवाह करणाऱ्या दीडशे जोडप्यांवर जातपंचायतीचा बहिष्कार
  • नंदीवाले समाजाच्या सहा जातपंचांवर कारवाई
  • पलूस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

उद्धव गोडसे | सांगली :

आंतरजातीय विवाह केलेल्या दीडशे जोडप्यांना नंदीवाले समाजातून बहिष्कृत करण्याची कारवाई जातपंचायतीने केली आहे. याप्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून, पोलिसांनी सहा जातपंचांवर गुन्हे दाखल केले आहेत, तर यातील चार पंचांवर अटकेची कारवाई झाली आहे. प्रकाश शंकर भोसले (रा. इस्लामपूर) या बहिष्कृत तरुणाने याबाबत फिर्याद दिली आहे. (Inter Caste Marriages in Maharashtra)

पलूस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदीवाले समाजातील आंतरजातीय विवाह केलेल्या दीडशे जोडप्यांवर जात पंचायतीने बहिष्कार टाकला आहे. बहिष्कृत जोडप्यांना समाजाच्या कोणत्याही समारंभात स्थान देऊ नये, असा आदेश जातपंचायतीने गेल्या वर्षी दिला होता. याविरोधात सातारा जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार दाखल झाल्यानंतर सातारा पोलीस आणि अंनिसच्या कार्यकर्त्यांनी मेढा येथे जात पंचायतीची बैठक बोलावली होती.

राज्यातील करोना रुग्णांची संख्या झाली स्थिर?; अशी आहे आजची स्थिती

जून २०२१ मध्ये झालेल्या बैठकीत जातपंचांनी बहिष्कार मागे घेतल्याचे जाहीर केलं होतं. त्यानंतर २६ डिसेंबर २०१९ रोजी कराडमध्ये झालेल्या जात पंचायतीच्या बैठकीत देखील संबंधित जोडप्यांवरील बहिष्कार मागे घेतल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु काही जातपंचांनी त्या निर्णयाला विरोध दर्शवला. त्यानंतर ९ जानेवारी रोजी पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथे झालेल्या जातपंचायतीच्या सभेत दीडशे जोडप्यांवरील बहिष्कार कायम असल्याचे जाहीर करण्यात आले.

नंदीवाले समाजाच्या जातपंचायतीविरोधात बहिष्कृत तरुणांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. इस्लामपूरमधील बहिष्कृत तरुण प्रकाश भोसले याने पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन, जातपंचायतीवर कारवाई करण्याची मागणी केली. यानुसार पोलिसांनी विलास शंकर भिंगार्डे, चंद्रकांत बापू पवार (दोघेही रा. इस्लामपूर), शामराव श्रीरंग देशमुख, अशोक शंकर भोसले (दोघेही रा. दुधोंडी, ता. पलूस), किसन रामा इंगवले, (रा. जुळेवाडी, ता. कराड) आणि विलास बापू मोकाशी (रा. निमणी, ता. पलूस) या सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, तर यापैकी चौघांना पलूस पोलिसांनी अटक केली आहे.

बहिष्कृत केलेल्या जोडप्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुन्हा समाजात घ्यायचं असल्यास जात पंचायतीकडून पाच हजार रुपयांचा दंड आकारला जातो. फिर्यादी प्रकाश भोसले यांनी जात पंचायतीकडे पाच हजार रुपये भरल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांना पुन्हा समाजात घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. जात पंचायतीच्या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याबाबत आणखी काही जातपंचांवर अटकेची कारवाई होऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here