नागपूर : संपावरून परत येणारे कर्मचारी, निवृत्त तसेच खासगी चालक यांच्यामुळे एसटीच्या फेऱ्या हळूहळू वाढू लागल्या आहेत. रविवारी नागपूर विभागातील ७६ बसेसनी तब्बल १७४ फेऱ्या केल्या.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सव्वादोन महिन्यांपूर्वी पुकारलेला संप अजूनही सुरूच आहे. अर्थात या आंदोलनात आता कोणतीही अधिकृत संघटना नसल्याने अनेक कर्मचारी संपातून माघार घेत कामावर परतत आहेत. संपातील काही कर्मचाऱ्यांवर यापूर्वीच बरखास्तीची कारवाई झाली आहे. एसटी प्रशासनातर्फे आंदोलकांना संप थांबवून कामावर परत येण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. मात्र, ज्यांच्यावर बरखास्तीची कारवाई झाली त्यांना वगळून इतरांसाठी ही दारे खुली आहेत. दरम्यानच्या काळात प्रवाशांची गैरसोय होत असल्याने प्रशासनाने निवृत्त कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली. त्याचप्रमाणे काही खासगी चालकांनाही कामावर घेतले. त्यामुळे विविध ठिकाणच्या बसेस सुरू होऊ शकल्या. रविवारी संपावरील केवळ एक कर्मचारी रुजू झाला. मात्र, आतापर्यंत नागपूर विभागात ३९ चालक व ४९ वाहकांसह तब्बल १२७ कर्मचारी रुजू झाले आहेत. कर्मचारी कामावर परत आले तर त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये भयंकर वाढ, ११ महिन्यांचा आकडा पाहून विश्वास बसणार नाही! साडेचार लाखांचे उत्पन्न
रविवारी गणेशपेठ आगारातून ३०, इमामवाडातून पाच, घाटरोडमधून २२, उमरेडमधून तीन, सावनेरातून सहा, वर्धमाननगरातून सात, काटोलातून एक व रामटेक आगारातून दोन बसेस निघाल्या. या बसेसद्वारे ५,१८६ जणांनी प्रवास केला व त्यातून एसटीला ४ लाख ६६ हजार ३२८ रुपयांचे उत्पन्न झाले.