हायलाइट्स:
- घरगुती सिलिंडर स्फोटात वडील आणि मुलाचा होरपळून मृत्यू
- वेंगुर्ला येथील वायंगणी बागायतवाडी येथील दुर्दैवी घटना
- स्फोटानंतर लागलेल्या आगीत घर जळून खाक
- निराधार महिलेला आर्थिक मदत देण्याची मागणी
नाईक कुटुंब मासे विक्रीतून उदरनिर्वाह करत असे. पती वसंत नाईक, पत्नी मनीषा आणि मुलगा गणेश या तिघांचे हे कुटुंब होते. सिलिंडर स्फोटानंतर लागलेल्या आगीत घर जळून खाक झाले. या आगीत वसंत नाईक आणि गणेश यांचा होरपळून मृत्यू झाला. वसंत नाईक यांना आठ दिवसांपूर्वीच अर्धांगवायूचा झटका आला होता. तर मुलगा पदवीधर असूनही बेरोजगार होता. तो घरीच आजारी वडिलांची देखभाल करत होता. घरातील प्रमुख व्यक्ती आणि तरूण मुलगा गमावल्याने मनीषा या निराधार झाल्या आहेत.
या घटनेची माहिती सुहास तोरसकर यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक तानाजी मोरे, वेंगुर्ला तहसीलदार प्रवीण लोकरे, कॉन्स्टेबल डी. बी. पालकर व वाडेकर यांसह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. वायंगणी सरपंच सुमन कामत, ग्रामसेवक संदीप गवस, तलाठी मीनल चव्हाण, उपसरपंच हर्षदा साळगांवकर, सदस्य सतीश कामत, बाळू कोचरेकर, चंद्रशेखर येरागी, शिवसेना तालुका प्रमुख यशवंत परब, नितीन मांजरेकर आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, वेंगुर्ला नगरपरिषद व एमआयडीसी कुडाळच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ ही आग आटोक्यात आणली. पण तोपर्यंत या आगीत पिता-पुत्राचा होरपळून मृत्यू झाला होता. दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन वेंगुर्ला येथील ग्रामीण रग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आले. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.