अहमदनगरः नगरमध्ये आणखी दोन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही परदेशी नागरिक असून, एक व्यक्ती फ्रान्स तर दुसरा आयव्हरी कोस्टचा आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी याबाबत माहिती दिली.

नगर जिल्ह्यामध्ये हे दोघे जण कामानिमित्त आले होते. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या ९ जणांना देखील प्रशासनाने ताब्यात घेतले असून, त्यांचे स्त्राव चाचणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यामध्ये यापूर्वी तीन करोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यामुळे करोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या पाच झाली असून, त्यापैकी एक रुग्ण बरा झाला असून त्याला आजच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नगरमध्ये मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले होते. परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येत होती. या प्रत्येकाची स्त्राव नमुना चाचणी करण्यात येत होती. त्यामध्ये काही परदेशी नागरिकत्व असणाऱ्यांचा सुद्धा समावेश होता. त्यापैकी परदेशी नागरिक असणाऱ्या दोघांचा स्त्राव नमुना चाचणीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला असून, त्यांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या दोघांना आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले असून दोघांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here