एन डी पाटील यांचे निधन शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन.डी. पाटील (N D Patil यांचं निधन झालंय. कोल्हापुरात उपचारादरम्यान वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

त्यांच्या निधनानं राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्त्व हरपलंय. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांच्या अनेक प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले. त्यांच्या निधनानं कोल्हापूरसह राज्यावर शोककळा पसरली आहे.
प्राध्यापक एन डी पाटील यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात असून अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘निस्वार्थी नेता हरपला’
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले.

शेतकरी कामगार पक्षाची धुरा निष्ठेने सांभाळणार्‍या एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची जबाबदारीही त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तितक्याच क्षमतेने पार पाडली. संस्थेच्या वाटचालीतील त्यांचे योगदान कधीच पुसले जाणार नाही. सर्व कुटुंबियांप्रति या दुःखद प्रसंगी सांत्वना व्यक्त करतो. प्रा. एन. डी. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

‘सामाजिक, राजकीय जीवनावर प्रभाव’
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. गडकरी यांनी म्हटलं आहे, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. राज्याच्या सामाजिक व राजकीय जीवनावर प्रा. पाटील यांचा मोठा प्रभाव राहिला आहे. शेतकरी – कामगार यांचे अनेक प्रश्न त्यांनी वेळोवेळी मांडले व ते सोडवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, असं गडकरींनी म्हटलं आहे.

‘महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं योगदान’
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रा.पाटीलयांचं महत्त्वाचं योगदान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख राहिली आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

‘अनुभवी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला’
तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रा. एन डी पाटील यांच्या निधनावे खूप ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.Zee24 Taas: Maharashtra News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here