हायलाइट्स:
- भिवंडीतील बंद पडलेल्या कंपनीला भीषण आग
- पाच तासांपासून धुमसत होती आग
- अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश
- बंद कंपनीत आग लागल्याने परिसरात घबराट
भिवंडी येथील खाडी पार परिसरातील काजी कंपाउंड येथील एका बंद पडलेल्या कंपनीला अचानक आग लागली. या कंपनीला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. भिवंडी-निजामपूर पोलीस, अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दलाचे दोन बंब आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. आग नियंत्रणात आणण्यासाठी कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर सव्वासहाच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले.
ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात आला आहे. भिवंडीतील काजी कंपाउंडमध्ये अनेक कंपन्या बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे या परिसरात कुठलीही रहदारी नसते. या कंपनीमध्ये कपडे तयार केले जात होते, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ही कंपनी बंद पडलेली होती. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती भिवंडी अग्निशमन दलाकडून देण्यात आली. मात्र या आगीत कंपनीच्या आतील संपूर्ण भाग जाळून खाक झाला आहे. बंद पडलेल्या या कंपनीत अचानक आग लागल्याने आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली होती.
कल्याणमधील कांबा पठार पाड्यातील आदिवासी त्रस्त; ‘या’ ब्लास्टनं उडवली झोप
उड्डाणपुलावरून बॅनरबाजीच्या माध्यमातून श्रेयवादाची लढाई सुरूच