हायलाइट्स:
- बार्शीचा बिगबुल विशाल फटे अखेर सर्वांसमोर आला
- व्हिडिओ जारी करत मांडली स्वत:ची भूमिका
- आज पोलिसांसमोर येणार शरण
‘मी जो व्यवसाय केला त्यात कुटुंबातील कुठल्याच सदस्याचा सहभाग नव्हता. फक्त कागदोपत्री ते संचालक होते,’ असा खुलासा विशाल फटे याने केला आहे. ज्यांचा मनीमल्टीप्लिकेशनवर विश्वास बसत नाही त्यांनी ट्रेंडिंग व्हीवच्या पेड प्लॅनमध्ये जाऊन राहुल कृष्णाच्या फंड्याचा अभ्यास करावा. मीही तो करत होतो. पण मला वेळ कमी मिळाला आणि त्यामुळं सर्व संपलं,’ असं फटे याने आपल्या व्हिडिओत म्हटलं आहे.
…म्हणून विशाल फटे झाला भावुक
विशालचे वडील अंबादास आणि भाऊ वैभव यांना पोलिसांनी अटक केल्याने विशाल भावुक झाला. आज त्याच्या आईला ताब्यात घेण्यात येणार असल्याने विशाल शरण येणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे. शेअर मार्केट अल्गोरिदमच्या नावाखाली बार्शीतल्या असंख्य नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप विशाल फटेवर आहे. त्याच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात आतापर्यंत ६८ गुंतवणूकदारांनी फसवणुकीची फिर्याद दिली आहे. त्यात जवळपास १८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे म्हटलं आहे.
दरम्यान, लोकांची फसवणूक करण्याचा किंवा देश सोडून पळून जाण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. मात्र मी पैसे जमा करण्यासाठी काही दिवस बाहेर असल्याने लोकांनी अफवा पसरवल्या, असा दावाही विशाल फटे याने केला आहे.