हा संपूर्ण चित्रपट ‘कबुली’ या एका धाग्यावर चालतो. या कबुलीजबाबाभोवती पटकथा रचताना लेखक स्वतःच्याच लिखाणाच्या प्रेमात पडल्याचं भासतं. याचं कारण, काही प्रसंग मुद्दाम कथेत गुंफल्यासारखे भासतात. त्यांना कदाचित कात्रीही लावता आली असती. प्रेक्षकांना प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्याच्या नादात सिनेमा रेंगाळतो आणि त्याचा एकूण परिणाम उणावतो. ही गोष्ट तिघांची आहे. रेणू-रणजित हे नवरा-बायको आहेत. त्यांचा प्रेमविवाह झाला आहे. रोहित हा रेणूच्या आयुष्यात लग्नानंतर आला आहे. तो तिचा चांगला मित्र आहे. साहजिक इथं ‘लव्ह ट्रँगल’ आहे; पण तो काहीसा वेगळा आहे. ही गोष्ट या चित्रपटाच्या कथानकाला इतर प्रेमप्रकरणांपेक्षा वेगळी ठरवते. रेणू () कामानिमित्त गोव्याला जाते. तिथं तिला रोहित () हा तरुण भेटतो. पहिल्या भेटीमध्येच रोहित रेणूसोबत फ्लर्ट करू लागतो. मोकळेपणानं तिच्याशी वागतो, बोलतो. अगदी एखाद्या जवळच्या माणसाप्रमाणं रेणूला वागवतो. रेणूला व्यक्त होण्यासाठी धीर देतो. या सगळ्यांत रेणू आणि रोहित यांच्यात मैत्री होते आणि दिवसागणिक त्यांच्यात आकर्षण वाढत जातं. पुढं असं काही घडतं ज्यामुळे रेणू अस्वस्थ होते. ती मुंबईला निघून येते आणि रणजितकडे () घडलेल्या या सगळ्या प्रकारची कबुली देते. हा कबुलीजबाबाचा मामला पटकथेत भूतकाळ-वर्तमान-भूतकाळ या साखळीत लिहिला गेला आहे.
स्पृहा आणि सिद्धार्थ यांनी चांगलं काम केलं आहे. त्यांचा पडद्यावरचा वावर आणि सहजता छान. दोघांमधले प्रसंग आणि संवाद नैसर्गिक झाले आहेत. परिणामी रेणू आणि रोहित या व्यक्तिरेखा लक्षात राहतात. कश्यपला पटकथेत तितकासा वाव नसूनही वाट्याला आलेली भूमिका त्यानं प्रामाणिकपणे साकारली आहे. चित्रपट फारसा चकचकीत नाही. निर्मिती मूल्यातल्या मर्यादा जाणवतात. तांत्रिक बाजूही ठीक आहेत; पण स्पृहा-सिद्धार्थसाठी हा चित्रपट पाहायला हरकत नाही. चित्रपटाच्या उत्तरार्धात जो संदेश किंबहुना जो ट्विस्ट आहे, तो आजच्या तरुण दाम्पत्यांना शिकवण देणारा आहे.
कॉफी
निर्माते : कैलाश सोराडी, विमला सोराडी
दिग्दर्शक : नितीन कांबळे
कथा-पटकथा : मच्छिंद्र बुगडे
कलाकार : सिद्धार्थ चांदेकर, स्पृहा जोशी, कश्यप परुळेकर
संकलन : राहुल भातणकर
छायांकन : आय. गिरिधरन
दर्जा : २.५ स्टार