हायलाइट्स:
- शरद पवार यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांची टीका
- नवाब मलिक यांनी दिले देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर
- शरद पवार हे फडणवीसांना कात्रजचा घाट दाखवतील- मलिक
शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादित असलेला पक्ष असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. फडणवीसांच्या या विधानानंतर अजित पवार यांनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक यांनी टोला लगावला आहे. शरद पवार यांनी याआधी फडणवीस यांना ‘कात्रजचा घाट’ दाखवला आहे. आता तर पवार हे फडणवीसांना ‘काशीचा घाट’ दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असं मलिक म्हणाले.
..तेव्हा फडणवीस विधानसभेत निवडूनही आले नाहीत
शरद पवार हे मुख्यमंत्री असताना फडणवीस कधी विधानसभेत सदस्य म्हणूनही निवडून आले नाहीत. कालपर्यंत राज्यात २५ ते ३० जागा निवडून येत होत्या , ते आता पवार यांच्याबाबत भाष्य करत आहेत. याअगोदरही पवार यांच्यावर फडणवीस भाष्य करत होते. त्यावेळी काय झाले? अशी आठवणही नवाब मलिक यांनी फडणवीस यांना करून दिली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा केवळ पश्चिम महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे. पक्षाचं नाव राष्ट्रवादी ठेवलं म्हणून त्यांचा पक्ष राष्ट्रवादी होत नाही. शरद पवार यांचा पक्ष असा आहे, ‘पानी तेरा रंग कैसा, जिस मे मिलाए उसके जैसा’. ते कधी सपाशी संवाद साधतात, कधी तृणमूल काँग्रेसशी बोलणी करतात. त्याच्या पक्षाचे अस्तित्व राष्ट्रीय नाही, त्यांच्याकडे राष्ट्रीय विचारही नाही. नाव राष्ट्रवादी काँग्रेस असलं तरी तो पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित असलेला पक्ष आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.