हायलाइट्स:
- मृतांत एका पाकिस्तानी नागरिकाचाही समावेश
- ड्रोनच्या सहाय्यानं आंतरराष्ट्रीय विमानतळाला केलं टार्गेट
- हुती बंडखोरांनी स्वीकारली स्फोटाची जबाबदारी
संयुक्त अरब अमिरातीत आज यमनच्या हुती बंडखोरांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यानं अनेकांना धक्का बसलाय. अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्माण स्थळावर सोमवारी घडवून आणण्यात आलेल्या दोन स्फोटांत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. यामध्ये, दोन भारतीयांचा समावेश आहे. तर इतर सहा जण या हल्ल्यात गंभीर जखमी झालेत. संयुक्त अरब अमिरातीच्या राज्य वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलंय.
अल अरबियानं सरकारी न्यूज एजन्सी ‘डब्ल्यूएएम’च्या हवाल्यानं दिलेल्या बातमीत, अबुधाबीत झालेल्या इंधन टँकर स्फोटात तीन जणांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिलाय. यामध्ये दोन भारतीय तर एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलंय.
येमेनच्या गृहयुद्धात सौदी अरेबियाबरोबर युती करून यूएईदेखील हुतींविरूद्ध लढा देत आहे. यूएईने नुकतंच येमेनमधील हुती बंडखोरांविरुद्ध हवाई मोहीम तीव्र केली होती. इराण-समर्थित बंडखोरांच्या गटानं (हुती) यास प्रत्यूत्तर दिलं जाईल, अशी धमकीही यापूर्वी दिली होती. आजचा (सोमवार) हल्ला हा याच कारवाईचा भाग म्हटला जातोय. यापूर्वी, येमेनमध्ये कार्यरत असलेल्या इराण समर्थित हुथी बंडखोरांनी संयुक्त अरब अमिराती (यूएई) जहाज रवाबीच्या सात भारतीय क्रू सदस्यांनाही ताब्यात घेतलंय.