जळगाव : जळगाव तालुक्यात सोमवारी वेगवेगळ्या ठिकाणच्या घटनेत दोन जणांनी आत्महत्या करुन जीवनयात्रा संपवली आहे. यात एका घटनेत विटनेर येथील विष प्राशन केलेल्या शेतकर्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर दुसर्‍या घटनेत जळगाव शहरातील खोटेनगर येथे एका राष्ट्रीयकृत बँकेच्या शिपायाने गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला आहे.

शहरातील खोटेनगर येथील रवींद्र पुंडलिक बागुल (वय ५०) या एका राष्ट्रीयकृत बँकेच्या शिपायाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ६ वाजता समोर आली. बँकेत नोकरीला असलेले बागुल खोटे सुरक्षा नगरात पत्नी वंदना, मुलगा ज्ञानेश्वर व मुलगी आरती यांच्यासह वास्तव्याला होते. वरच्या मजल्यावर रवींद्र बागुल तर तळमजल्यावर भाऊ राजेंद्र बागुल राहतात. रवींद्र बागुल यांनी सकाळी सहा वाजता गळफास घेतल्याचं आढळून आलं. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पत्नी व मुलांनी धाव घेत त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवलं, मात्र तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

Delhi IED Case: दिल्लीत दहशतवाद्यांनी प्लांट केला होता बॉम्ब!; ‘या’ पत्रामुळे उडाली खळबळ

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

रवींद्र बागुल यांच्या खिशात चिठ्ठी वगैरे काहीच आढळून आली नाही. मुलगा ज्ञानेश्वर मोबाईल दुरुस्तीचे काम करतो. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नयन पाटील, हवालदार अनिल फेगडे, दिनेश पाटील यांनी पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बागुल यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. एक भाऊ पोलीस दलात नोकरीला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विटनेर येथील शेतकर्‍याचे विष प्राशन

जळगाव तालुक्यातील विटनेर येथील शेतकरी गोकुळ पांडुरंग वराडे (वय ४९) यांनी विष प्राशन करुन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. गोकुळ वराडे मकर संक्रातीला शेतात फवारणीसाठी गेले होते. यादरम्यान त्यांनी विषारी द्रव्य सेवन केले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबाने त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना रविवारी रात्री ११ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वराडे यांनी जळके स्टेट बँक शाखेतून शेतासाठी कर्ज घेतले आहे. त्यांच्याकडे स्वतः च्या मालकीचे विटनेर शिवारात एकूण ८० आर जमिनीचे क्षेत्र आहे. कर्जाच्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here