मुंबई: राज्यातील ३५ करोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज रविवारी नवीन २२ रुग्णांची नोंद झाली असून, महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णसंख्या २०३ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे असून, पाच रुग्ण पुण्याचे आहेत. नागपूर तीन, अहमदनगर २ आणि सांगली, बुलडाणा व जळगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे, असे टोपे यांनी सांगितले.

राज्यात आज रविवारी दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. एका ४० वर्षीय महिलेचा काल केईएम रुग्णालयात मृत्यू झाला होता. ती करोनाबाधित असल्याचे आज रविवारी स्पष्ट झाले. तिला उच्च रक्तदाबही होता. बुलडाणा येथे एका ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू करोनामुळे झाला. त्याला मधुमेहाचाही विकार होता. राज्यातील करोनाबाधित मृत्यूची संख्या आता आठ झाली आहे.

राज्यात आज एकूण ३९४ जण विविध रुग्णालयांत भरती आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ४ हजार २१० जणांना भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ३ हजार ४५३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत. तर २०३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ३५ करोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १७ हजार १५१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ९६० जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहितीही टोपे यांनी दिली.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील:

मुंबई ८५, पुणे (शहर व ग्रामीण भाग) ३७, सांगली २५, मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा २३, नागपूर १४, यवतमाळ ४, अहमदनगर ५, सातारा २, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोंदिया, जळगाव, बुलडाणा प्रत्येकी १, इतर राज्य- गुजरात १, एकूण २०३.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here