हायलाइट्स:
- नाना पटोले यांचा मोदींवरील टीकेचा व्हिडिओ व्हायरल
- नाना पटोले यांच्यावर भाजप नेत्यांची टीका
- गुन्हा दाखल करण्याची भाजप नेत्यांची मागणी
- राम कदम यांंनी दिला इशारा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्यांनी पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप नेते राम कदम यांनी नाना पटोले यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. गृहमंत्री, डीजीपी यांनी पटोले यांच्याविरोधात तात्काळ एफआयआर दाखल करावा. त्यांची जागा लोकांमध्ये नाही तर, तुरुंगात आहे, असं ट्विट कदम यांनी केले आहे.
भाजप नेते राम कदम यांनी पटोलेंवर टीका करताना, त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरही निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ते जिंकू शकत नाहीत हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे त्यांचे असे अभद्र विचार आहेत. लोकांनी त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केल्यानंतर मी दुसऱ्याच कुणाविरोधात वक्तव्य केल्याचे ते बोलत आहेत. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना कुणालाही मारहाण करण्याची किंवा शिवीगाळ करण्याची सूट ठाकरे सरकारने दिली आहे का, असा सवालही कदम यांनी केला. या प्रकरणात जर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून निषेध नोंदवू, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, नाना पटोले यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ‘मी मोदीला मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो’ असं वक्तव्य करताना पटोले दिसत आहेत. यानंतर भाजप नेत्यांनी नाना पटोलेंवर टीकेची झोड उठवली आहे. नाना पटोले यांनी यानंतर स्पष्टीकरण दिले आहे. मी कोणतेही भाषण देत नव्हतो. भंडारा जिल्ह्यात मोदी नावाचा एका गुंड आहे. त्याच्याविषयी बोलत होतो. कोणतेही भाषण देत नव्हतो, असे स्पष्टीकरण पटोले यांनी दिले आहे.