हायलाइट्स:
- फक्त राबडी देवीचं नाव घेतलं म्हणून तुम्ही दोघा-चौघांना जेलमध्ये टाकलंत
- आता तुमच्याच मित्रपक्षाच्या अध्यक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याची भाषा केली आहे
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यातील भाजप नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. राज्यात ठिकठिकाणी नाना पटोले यांच्याविरोधात भाजपकडून निदर्शने सुरु आहेत. नाना पटोले यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांच्या मुंबई आणि भंडाऱ्यातील घराबाहेरील पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी आपली बाजू मांडली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काहीही बोललो नाही. मी ज्या मोदींचा उल्लेख केला तो गावगुंड आहे. मात्र, भाजप मोदी नावावरुन विनाकारण रान उठवून पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवत आहे. आता काँग्रेसच भाजपविरोधात तक्रार दाखल करेल, असे नाना पटोले यांनी म्हटले.
मोदींवर टीका करणाऱ्या नाना पटोलेंना अटक करा: नितीन गडकरी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. नितीन गडकरी यांनी ट्विट करुन यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, असे ट्विट गडकरी यांनी म्हटले.