हायलाइट्स:
- नाना पटोले यांच्याविरोधात भाजप आक्रमक
- केशव उपाध्ये यांचे नाना पटोलेंवर टीकास्त्र
- पटोलेंविरोधात तक्रार करणाऱ्यांनाच ताब्यात घेतल्याचा आरोप
- भाजप याविरोधात आंदोलन करणार, उपाध्येंचा इशारा
नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी नाना पटोले आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. नितीन गडकरी, राम कदम यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. तर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनीही नाना पटोले आणि काँग्रेसवर तोफ डागली आहे. तसेच विविध ठिकाणी भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून नाना पटोले यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पटोले यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र, तक्रार दाखल करणाऱ्या नेत्यांवरच कारवाई केली जात असल्याचा प्रकार राज्यात सुरू आहे. तक्रार करण्यासाठी बावनकुळे हे चार तास बसून होते. त्यानंतर त्यांनाच ताब्यात घेण्यात आले, असे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले.
बावनकुळे यांना ताब्यात घेतल्याचा प्रकार घडला आहे, असे सांगतानाच हा प्रकार म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ असाच आहे, असे केशव उपाध्ये म्हणाले. महाराष्ट्रात नाना पटोले यांनी केलेले विधान, त्यांनी केलेला खुलासा हा ‘चोर तो चोर…’ अशाच स्वरूपाचा आहे, असेही ते म्हणाले. ज्यांनी गुन्हा केला, त्यांना अटक करण्याऐवजी, जे तक्रार दाखल करण्यासाठी जात आहेत, अशांवर कारवाई केली जात आहे. याविरोधात भाजप राज्यात आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला. नाना पटोले यांनी जो खुलासा केला आहे, त्यात तो कोण गावगुंड? त्याच्यावर किती खटले? काय कारवाई केली आहे, हे स्पष्ट केले पाहिजे, असेही उपाध्ये म्हणाले.