निफाड तालुक्यातील लासलगावजवळच्या नंदनवन नगर पिंपळगाव येथील ३० वर्षीय तरुण हा रजा नगर येथील दुकानात काम करत होता. त्याला १२ मार्च रोजी खोकला व ताप आला होता. करोना सदृश्य लक्षणं दिसून येत असल्यानं तो खासगी रुग्णालयात गेला होता. परंतू त्याला बरे वाटले नाही. त्यामुळं तो पुन्हा २५ मार्च रोजी लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेला. न्युमोनिया सदृश लक्षणे दिसत असल्यामुळे त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तो २७ मार्चला जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. त्याला विलगीकरण कक्षात ठेवलं. त्याचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून, तो करोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. उर्वरित करोना विलगीकरण कक्षातील दाखल रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सध्या करोना विलगीकरण कक्षांत ७ रुग्ण दाखल आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना उद्या घरी सोडण्यात येणार आहे. करोनाग्रस्ताच्या घराच्या परिसरातील व्यक्तींचा शोध साथरोग सर्वेक्षण पथकामार्फत सुरू आहे.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये, घराबाहेर पडू नका. हात स्वच्छ धुवा, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त, तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times