हायलाइट्स:
- पटोले यांनी त्यांच्या राष्ट्रीय नेत्याकडून हा गुण घेतला असेल
- त्यांचा नेताही दररोज अशीच वादग्रस्त विधानं करत असतो
- त्या मानाने नेत्याची आई शांत असते
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मुद्दाही उपस्थित केला. यासाठी आम्ही नाना पटोले यांच्याविरुद्ध न्यायालयात आणि राज्यपालांकडे जाऊन तक्रार दाखल करणार आहोत. तर आणखी एका प्रकरणात आम्ही राज्यपाल आणि लोकायुक्तांची भेट घेणार आहोत. महाविकासआघाडी सरकारने काही दिवसांपूर्वी आमदार प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामाचा दंड आणि व्याज माफ केले. हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित असणाऱ्या आणि या प्रस्तावाला मान्यता देणाऱ्या प्रत्येक मंत्र्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. एखाद्या बँकेच्या संचालक मंडळाने अनधिकृत पद्धतीने कर्ज दिले तर संपूर्ण संचालक मंडळ तुरुंगात जाते. त्याप्रमाणेच या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक मंत्र्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसेच हे संपूर्ण मंत्रिमंडळच बरखास्त झाले पाहिजे, अशी मागणी आम्ही लोकायुक्त आणि राज्यपालांकडे करणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
नाना पटोलेंनी त्यांच्या राष्ट्रीय नेत्याकडून हे गुण घेतले असतील: चंद्रकांत पाटील
नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी गेल्या काही दिवसांत दोनवेळा आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. पटोले यांनी त्यांच्या राष्ट्रीय नेत्याकडून हा गुण घेतला असेल. त्यांचा नेताही दररोज अशीच वादग्रस्त विधानं करत असतो. त्या मानाने नेत्याची आई शांत असते, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. महाराष्ट्रातील पोलीस हे दबावाखाली काम करत आहेत. भाजपचे कार्य़कर्ते नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन करत आहेत. पण पोलीस आमच्याच कार्यकर्त्यांना अटक करत आहेत.
मध्यंतरी नारायण राणे यांनी थोबाडीत मारेन म्हटलं तर त्यांना अटक झाली. त्यानंतर एका पत्रकारपरिषदेत त्यांनी नितेशचा पत्ता माहिती असला तरी सांगणार नाही, असे म्हटल्यावर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली. राज्यातील पोलीस अशाचप्रकारे भाजपच्या कार्यकर्त्यांना हैराण करत आहेत. पण नाना पटोले यांच्यावर कारवाई करत नाहीत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.