यापुढेही कारवाई सुरूच राहणार
करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आणि संचारबंदीच्या काळात पोलिसांनी आतापर्यंत ३३३ जणांवर कारवाई केली आहे. सर्वात अधिक गुन्हे झोन २ मध्ये दाखल करण्यात आलेले आहेत. यापुढील काळातही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मजुरांची निवास, जेवणाची सोय
पुणे शहरातील नागरिकांना अन्नधान्य आणि भाजीपाल्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी १३ हजार ५१६ भाजीपाल्याची दुकाने आणि ६४ शेतकरी बाजार संयोजकांकडून भाजीपाल्याचे वितरण केले जात असून, १८ हजार ४७९ किराणा दुकानांमधून धान्यवितरण सुरू आहे. शहरातील नागरिकांबरोबरच परराज्यातील किंवा परजिल्ह्यातील कामगार आणि मजूर यांची निवास आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून, संबंधित नागरिकांनी शहराबाहेर जाण्याचा प्रयत्न करू नये, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची वानवा
‘करोना’ विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने उपाययोजना केल्या जात असल्या तरी, गंभीर स्वरुपाचे रुग्ण पुण्याच्या नायडू संसर्गजन्य रुग्णालयात आल्यास मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. नायडू रुग्णालयात सर्व उपाययोजना केल्या जात असल्या तरी, तज्ज्ञ डॉक्टरांच्या हाताखाली काम करण्यासाठी प्रशिक्षित परिचारिकांसह कर्मचाऱ्यांची वानवा असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे गंभीर स्वरुपाचा रुग्ण आल्यास रुग्णालय अधिकाऱ्यांची दमछाक होणार असल्याचे सांगितले जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times