हायलाइट्स:

  • नगर जिल्ह्यात यावेळीही रुग्णसंख्येत वाढ कायम
  • एका दिवसात दीडपट रुग्णवाढ
  • अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत महत्त्वाचा निर्णय

अहमदनगर : राज्यातील अनेक भागांत करोना रुग्णांचे आकडे स्थिरावत असल्याने तिसरी लाट ओसरल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, दुसरी लाट दीर्घकाळ रेंगाळलेल्या नगर जिल्ह्यात यावेळीही रुग्णसंख्या वाढतच आहे. सोमवारी एका दिवसात दीडपट रुग्णवाढ झाली आणि मंगळवारीही ही वाढ कायम राहिली आहे. आणखी काही काळ रुग्ण वाढणार असल्याचा अंदाज आल्याने आता सर्व तालुक्यांतील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत या सूचना दिल्या आहेत. (अहमदनगर कोरोना प्रकरणे)

नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या १,४३२ करोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या ५,९२६ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४३ टक्क्यांवर घसरलं आहे. सर्वाधिक ५२२ रुग्ण नगर शहरात आहेत. नगर ग्रामीण, राहाता, पारनेर व श्रीरामपूर या तालुक्यांतही रुग्णसंख्येने शंभरी ओलांडली आहे.

Aparna Yadav : भाजपचा सपावर पलटवार!; मुलायम यांची सून उद्या घेणार मोठा निर्णय?

या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची करोना विषयक आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आली‌. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विरेंद्र बडदे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसंच तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी भोसले म्हणाले की, जिल्ह्यातील करोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने अधिक सतर्क राहून काम केलं पाहिजे. त्यासाठी दररोजच्या चाचण्यांची संख्या नेहमीपेक्षा अधिक वाढवली पाहिजे‌. दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या मात्र लसीकरण न केलेल्या लोकांची संख्या काही तालुक्यांमध्ये जास्त आहे. दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करावे, अशा सूचनाही डॉ. भोसले यांनी केल्या.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे म्हणाले की, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील रूग्ण पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे‌. यासाठी कोविड नियमांचं काटेकोर पालन करण्यावर भर देण्याची अवश्यकता आहे.

दरम्यान, जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या अधिक होती. त्यावेळी जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली होती. लाट ओसरल्यानंतर ती बंद करण्यात आली होती. आता ती पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहेत. यावेळी गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे. अनेक रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे होत आहेत. मात्र, त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने आता कोविड केअर सेंटर सुरू करून रुग्णांना तेथे दाखल करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here