हायलाइट्स:
- करोनाच्या तिसऱ्या लाटेतही कोविड योद्ध्यांना तडाखा
- मुंबई, पुणे शहर पोलीस दलात कर्मचारी करोनाबाधित
- २४ तासांत मुंबईत पोलीस दलातील २८, पुण्यातील २१ कर्मचारी पॉझिटिव्ह
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, पोलीस दलातील २८ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या २४ तासांतील ही आकडेवारी आहे. मुंबई पोलीस दलातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १२७३ वर पोहोचली आहे. तर पुणे शहर पोलीस विभागातील २१ पोलीस कर्मचाऱ्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ५०४ वर पोहोचली आहे.
महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही
राज्यात मंगळवारी ५३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तर दिवसभरात ३९ हजार २०७ नवीन रुग्णांचे निदान झाले. त्याचवेळी ३८ हजार ८२४ रुग्ण बरे होऊन घरी परत गेले आहेत. तथापि, राज्यात ओमिक्रॉनचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिली.
राज्यात आजपर्यंत एकूण ६८ लाख ६८ हजार ८१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३२ टक्के इतके आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीत मंगळवारी ६ हजार १४९ नवीन रुग्णांचे निदान झाले. यामुळे मुंबईतील रुग्णांची एकूण संख्या १० लाख ११ हजार ३१४ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत आजतागायत करोनामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण मृत्यू संख्या १६ हजार ४७६ इतकी झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ५३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यात आजतागायत करोनामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण मृत्युसंख्या एक लाख ४१ हजार ८८५ इतकी झाली आहे.