हायलाइट्स:
- गोवा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी पॅटर्न अयशस्वी
- शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली माहिती
- शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची आज घोषणा
- संजय राऊत यांनी साधला काँग्रेसवर निशाणा
गोव्यात काँग्रेससोबत आमची आघाडी होऊ शकली नाही. मात्र आमची चर्चा सुरू आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबाबत आज, बुधवारी निर्णय होण्याची अपेक्षा आहे, असे संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. गोव्यात जर खिचडी बनत असेल तर, कडीपत्ता, हळद अशापैकी काही न काही आम्ही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस जरूर आणणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आज निर्णय जाहीर होण्याची शक्यता
गोव्यात आम्ही जास्त जागा लढवत नाही. आम्हाला मर्यादा काय आहे, किंवा आम्हाला काय करायचे आहे, हे ठाऊक आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये तिथे चांगली लढत होईल असे मला वाटते, असंही राऊत म्हणाले. तृणमूल काँग्रेस तिकडे ४० जागांवर निवडणूक लढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ते देऊ शकतात, असेही राऊत यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल गोव्यात आहेत. माझे आताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. मी देखील गोव्याला निघालो आहे. दुपारी आम्ही पत्रकार परिषद घेऊन त्यात निर्णय जाहीर करू, असेही राऊत यांनी सांगितले. गोव्यातही काँग्रेससोबत आघाडी व्हावी, यासाठी आम्ही दोन्ही पक्षांनी प्रयत्न केले. पण स्थानिक काँग्रेस नेत्यांना ती आघाडी पेलली नाही, म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि एकत्र लढतोय, असंही ते म्हणाले.