हायलाइट्स:
- ठाण्यातील शहापूर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने गड राखला
- १७ जागांपैकी १० जागा जिंकून सत्ता केली काबिज
- प्रतिष्ठेच्या लढतीत कपिल पाटील यांना मोठा धक्का
- काँग्रेस-राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही
ठाणे जिल्ह्यातील शहापूर नगरपंचायत निवडणूक दोन टप्प्यांत पार पडली. यामध्ये पहिल्या टप्प्यात १७ जागांपैकी १३ जागांसाठी २१ नोव्हेंबरला निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. त्यावेळी १३ जागांसाठी एकूण ३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर दुसऱ्या टप्प्यात १७ जागांपैकी उर्वरित ओबीसी आरक्षणाच्या ४ जागांवर १८ जानेवारीला निवडणूक प्रक्रिया पार पडली. या ४ जागांसाठी एकूण १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत १७ जागांसाठी ४६ उमेदवारांपैकी शिवसेनेचे १३, भाजप १३, राष्ट्रवादी कॉंग्रेस ७, कॉंग्रेस १, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष १ आणि अपक्ष १ उमेदवार होते. आज, बुधवारी १९ जानेवारी रोजी शहापूर नगरपंचायत निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला. आज सकाळी १० वाजताच मतमोजणीला सुरुवात झाली. तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडली. यामध्ये १७ जागांपैकी शिवसेनेने १० जागांवर विजय मिळवला. तर भाजपला ७ जागांवर विजय मिळाला. या निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा गड राखला. शहापूर नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. शहापूरमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकही उमेदवार निवडून न आल्याने सपाटून पराभव पत्करावा लागला आहे.
शहापूर नगरपंचायतीत शिवसेना १०, राष्ट्रवादी ३, भाजप ३, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल होते. यापैकी भाजपचे दोन नगरसेवक आणि एका अपक्ष नगरसेवकाने शिवसेनेत प्रवेश केला होता. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळाली. निवडणुकीत शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
दापोली नगरपंचायतीवर राष्ट्रवादीच्या मदतीने भगवा फडकवला