हायलाइट्स:
- अखेर चार वर्षीय मुलगा सुखरूप मिळाला
- काही दिवसांपूर्वी झालं होतं अपहरण
- अपहरण करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू
बावधन येथील हाय स्ट्रीट परिसरातून पायी जात असताना स्वर्णव उर्फ डुग्गू सतिश चव्हाण (वय-४) याचं एका व्यक्तीने अपहरण केलं होतं. स्वर्णव याला स्कुटीवरून नेतानाचे फोटो देखील व्हायरल झाले होते. या घटनेनंतर चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची नोंद करण्यात आली होती आणि पुणे पोलिसांनी कसून तपास सुरू केला होता. वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा शोध घेतला जात होता.
सोशल मीडियावरुन देखील मुलाच्या तपासाबाबत पोलिसांकडून आवाहन करण्यात आले होते. अखेर आज या तपासाला यश आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेला स्वर्णव उर्फ डुग्गू सतिश चव्हाण (वय-४) हा पुनावळे येथे सुखरूप सापडला असून त्याची मेडिकल टेस्ट करण्यात आली आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बालेवाडी पोलीस स्टेशन जवळून मंगळवारी १ जानेवारी २०२२ रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली होती. आज या मुलाची सुटका झाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. याप्रकरणी आरोपीचा शोध पुणे पोलिसांकडून सुरू असून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून तपासासाठी विशेष सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.