हायलाइट्स:
- मुंबईतील करोना लाट नियंत्रणात आहे काय?
- करोना परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची बीएमसीची माहिती
- मुंबई महापालिकेने दिली हायकोर्टात सविस्तर माहिती
- नागरिकांनी घाबरून जाऊ नये, महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर करोना परिस्थितीसंदर्भात माहिती दिली. शहर आणि परिसरात करोना परिस्थिती नियंत्रणात आहे. सध्याच्या करोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान करोना रुग्णसंख्येत हळूहळू घट होत आहे, असे वकील साखरे यांनी सांगितले.
साखरे यांनी खंडपीठाला सांगितले की, १५ जानेवारीपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, शहरातील करोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ८४,३५२ इतकी होती. त्यातील सात टक्के रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याची गरज भासली. याशिवाय तीन टक्के रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले. तर ०.७ टक्के व्हेंटिलेटरची आवश्यकता भासली. साखरे यांनी यावेळी हायकोर्टात महापालिकेच्या वतीने सविस्तर माहिती सादर केली. त्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या, ऑक्सिजन पुरवठा, औषधांचा साठा, रुग्णालयांतील उपलब्ध खाटा आदींची माहिती आहे. आमच्याकडे (महापालिका) पुरेसा ऑक्सिजन साठा आहे. रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.
मुंबईमध्ये करोना परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे का, अशी खंडपीठाने विचारणा केली असता, त्यावर होय, करोना परिस्थिती नियंत्रणात आहे, असे महापालिकेने सांगितले. आता सर्व काही नियंत्रणात आहे. करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ६ ते ९ पर्यंत करोना रुग्णांची संख्या ही २० हजारांवर पोहोचली होती. मात्र, १५ जानेवारी रोजी रुग्ण कमी नोंदवले गेले. ते जवळपास १० हजारांवर आले आणि गेल्या तीन दिवसांत ही संख्या घटून सात हजारांवर आली आहे, असेही साखरे यांनी खंडपीठासमोर सांगितले.