मुंबई: साधारण १२ वर्षांपूर्वी ‘धोबी घाट’ या चित्रपटाच्या माध्यमातून किरण रावनं दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. त्या प्रयत्नांना सिनेसृष्टीतील मंडळींसह प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तिने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट बघत होते. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा जवळजवळ संपत आली आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. तिने दिग्दर्शित केलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
विशेष म्हणजे त्या चित्रपटाची निर्मिती आमिर खान करत असल्याचं कळतंय. या चित्रपटाचं शीर्षक ठरलेलं नसून नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून पुण्याजवळच्या गावात चित्रीकरणाला सुरुवात झाल्याचं समजतंय. तर हा चित्रपट ड्रामा-कॉमेडी या प्रकारात मोडणारा आहे. चित्रपटाची कथा तीन मुख्य कलाकारांभोवती फिरते. ‘जमतारा: सबका नंबर आएगा’ या सीरिजमध्ये चमकलेला अभिनेता स्पर्श श्रीवास्तव सदर चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल. तर त्याच्यासह इंडस्ट्रीतील दोन लोकप्रिय अभिनेत्री स्क्रीन शेअर करतील.
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये चित्रीकरण पार पडणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. आता किरण रावचं दिग्दर्शन, आमिर खानची निर्मिती आणि दोन अभिनेत्री कोण असतील याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळत आहे.