हायलाइट्स:
- जळगावात विवाहितेची आत्महत्या
- सासरच्या व्यक्तींवर गंभीर आरोप
- पाच जणांविरुद्ध पोलिसांनी दाखल केला गुन्हा
प्राजक्ता उर्फ कोमल अजय बारी (बुंधे, वय २२, रा. शिरसोली) असं मृत विवाहितेचं नाव आहे. अकरा महिन्यांपूर्वीच या विवाहितेचे लग्न झालं होतं. विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन पतीसह पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राजक्ताईची आई मालती नंदलाल बारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फेब्रुवारी २०२१ रोजी प्राजक्ताचे लग्न अजय बुंधे याच्याशी झाले. लग्नात पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व दीड तोळ्याची गळ्यातील चेन दिली होती. लग्नानंतर प्राजक्ता शेंदूर्णी येथे माहेरी आली होती. यावेळी तिने आईजवळ लग्नात जास्त हुंडा न दिल्यामुळे सासरचे लोक सतत टोचून बोलतात, छळ करतात, असं सांगितलं होतं. यावेळी सासरचे लोक तिला घेण्यासाठी आलेच नाही. दोन महिन्यांनतर समजूत काढल्यानंतर आईने पुन्हा प्राजक्ताला सासरी सोडले.
यांनतर काही दिवस प्राजक्ता ही पती, सासू, सासऱ्यांसह हैद्राबाद येथे राहण्यासाठी गेली होती. तेथून परत आल्यांनतर पुन्हा एकदा सासरच्या लोकांनी तिच्याकडे दोन लाख रुपयांसाठी तगादा लावला आणि छळ सुरू केला. यांनतर त्यांनी प्राजक्ताला तिच्या आईशी संपर्कच करू दिला नाही. मंगळवारी मध्यरात्री प्राजक्ताने घराच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी पहाटे पाच वाजता हा प्रकार पती अजय याच्या लक्षात आला. यानंतर त्यांनी प्राजक्ताच्या आईला घटनेची माहिती दिली.
दरम्यान, प्राजक्ताच्या अंगावरील सर्व दागिने काढून घेतल्याचंही दिसून आले. सासरच्या लोकांनी केलेल्या छळास कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राजक्ताला भाऊ-बहीण नाही. आई-वडिलांची ती एकुलती एक मुलगी होती. ती लहान असतानाच तिच्या वडिलांचंही निधन झालं आहे.
सासरच्या पाच जणांवर गुन्हा
या आत्महत्येप्रकरणी प्राजक्ता हिचा पती अजय अशोक बुंधे, सासरा अशोक दगडू बुंधे, सासू शोभाबाई, दीर विजय बुंधे व नणंद वैशाली अशोक काळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.