हायलाइट्स:
- नियमांची अंमलबजावणी कडक करा
- अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना
- बारामतीत घेतली आढावा बैठक
सध्या करोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे संसर्गाची तिसरी लाट थोपवण्यासाठी प्रशासनाने करोना नियमांची अंमलबजावणी कडकपणे करावी. बारामती शहरात तसंच ग्रामीण भागात आरोग्य सोयीसुविधा उपलब्ध करुन ठेवणं आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त नागरिकांचा सहभाग नसावा. सर्वच नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे, त्यासाठी यंत्रणांनी लसीकरणावर भर द्यावा, असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.
अजित पवार यांनी यावेळी नागरिकांनाही आवाहन केलं आहे. मुखपट्टीचा (मास्क) वापर करावा, योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचं पालन करावं, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. धोडपकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, बारामती नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव आणि विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.