काही कर्मचारी भाजीपाला विकत आहे, तर काही कर्मचारी शेतात आद्रक काढणीच्या कामाला जात आहेत. गवंड्यांच्या हाताखाली काम करून उदरनिर्वाह करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. यात काही कर्मचारी विहिरीच्या कामावर जात असल्याचे समोर आले आहे. ट्रक, काळीपिवळी टॅक्सी असे मिळेल ते काम कर्मचारी करीत असल्याचे चित्र आहे.
परजिल्ह्यातील या कर्मचाऱ्यांना स्थानिक कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. काही दानशूर व्यक्तींची मदत घेत त्यांनी स्वतः पैसे जमा करीत कर्मचाऱ्यांना किराणा किट, भाजीपाला, अन्नधान्याची मदत केली आहे. मात्र, संपामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली असून संपावर तोडगा निघावा व एस टी पुन्हा पूर्ववत सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
काही बस फेऱ्या सुरू
सिल्लोड आगारात ९० चालक व ८५ वाहक असून यातील ९ चालक व २१ वाहक कामावर परतले आहेत. आगारातून औरंगाबाद व कन्नड अशा दिवसभरात २२ ते २४ फेऱ्या सुरू असल्याने बसस्थानकावर काही प्रमाणात प्रवाशांची वर्दळ दिसून येत आहे. ग्रामीण भागातील फेऱ्या मात्र अद्यापही बंदच आहे. आगारातील सर्व बसची वॉशिंग करून अद्यावत केलेल्या आहे. संपावर तोडगा निघावा व बससेवा पूर्ववत सुरू व्हावी, याची आम्ही वाट पाहात असल्याचे आगारप्रमुख आनंद चव्हाण यांनी सांगितले.