नागपूर : सहा वर्षांपूर्वी मोदी लाटेत उद्ध्वस्त झालेल्या काँग्रेसच्या गडाला नगरपंचायत निवडणुकीत नवसंजीवनी मिळाली. विदर्भात सर्वाधिक १७७ जागा मिळवून काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष म्हणून पुढे आला. भाजपने १११ जागा मिळवून दुसरे स्थान राखले. आरक्षण रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गातून ओबीसी जागा लढविण्यात आल्याने बंडखोरी वाढली. परिणामी अपक्षांच्या जागा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या विजयी उमेदवारांपेक्षाही वाढल्या. भाजपचे समीर मेघे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, अॅड. यशोमती ठाकूर यांनी आपले गड राखले. बच्चू कडू यांच्या प्रहारने बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूरमध्ये विजय मिळवित चमक दाखविली. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते खासदार प्रफुल्ल पटेल, भाजप नेते संजय कुटे यांना गृह जिल्ह्यातच धक्का बसला. नऊ जिल्ह्यांच्या २८ नगरपंचायतींमधील ४९३ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली.

नागपूर जिल्ह्यातील कुही नगरपंचायतीत भाजपला धक्का देऊन काँग्रेसने सत्तेचा मार्ग सोपा केला. हिंगण्यात भाजप नेते समीर मेघे यांना सत्ता कायम राखण्यात यश आले. चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींमध्ये काँग्रेसने सर्वाधिक १०२ जागा जिंकून सरशी मिळविली. या विजयाच्या माध्यमातून मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. पोंभूर्णात आमदार सुधीर मुनगंटीवार यांची जादू दिसली. जिवतीमध्ये भाजपला एकही जागा राखता आली नाही. गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी वगळता देवरी, अर्जुनी-मोरगावमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. सडक-अर्जुनीत राष्ट्रवादीने बाजी मारली. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर आणि मोहाडी नगरपंचायतीवर भाजप, तर लाखनीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ता काबीज केली आहे. नाना पटोले यांच्या मतदारसंघातील लाखनी, साकोलीत काँग्रेसचा प्रभाव दिसून न आल्याने चिंता वाढली आहे. वर्धा जिल्ह्यातील चारपैकी आष्टी, कारंजामध्ये काँग्रेसला बहुमत तर सेलू आणि समुद्रपूरमध्ये संमिश्र कौल मिळाला. या निवडणुकीत बसपच्या उमेदवारांचा विजय लक्षवेधी ठरला.

लवकरच डोक्यावरील टोपी निघणार; अब्दुल सत्तार यांची दानवेंवर खोचक टीका
अमरावती जिल्ह्यातील तिवस्यात पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने दहा जागा पटकावून बहुमत मिळविले. भाजप आणि राष्ट्रवादीला एकही जागा राखता आली नाही. भातकुलीत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाने बाजी मारली. यवतमाळ जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. राळेगावमध्ये स्पष्ट बहुमत असले तरी इतर पाचमध्ये महाविकास आघाडी करून सत्तेच्या समीप जाण्याचा प्रयत्न होणार आहे. मनसे, प्रहार आणि वंचित बहुजन आघाडीही विजयाचे आखाडे बसविताना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र, भाजपचे पाच आमदार असतानाही जिल्ह्यातील हा पराभव चिंतनाचा विषय ठरत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळ्यात काँग्रेस, तर संग्रामपूरमध्ये बच्चू कडू यांनी विजयी ‘प्रहार’ केला. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊनही संग्रामपूरमध्ये सत्तेची जादू दिसली नाही. आमदार संजय कुटे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला एकही जागा मिळविता आली नाही. वाशीम जिल्ह्यातील मानोऱ्याचा गड राष्ट्रवादीने राखला. काँग्रेसला दोन तर भाजपला एक जागा मिळाली. शिवसेना व वंचित बहुजन आघाडीला या ठिकाणी खातेही उघडता आले नाही.

ST Stike News : एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ; रोजगाराच्या शोधात सुरू केली ‘ही’ कामं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here