हायलाइट्स:
- उल्हासनगरमध्ये पोलिसांची धडक कारवाई
- जुगार खेळताना सात महिलांना केली अटक
- ४७ हजारांची रोकड पोलिसांनी केली जप्त
- अटकेनंतर महिलांची जामीनावर सुटका
उल्हासनगरमध्ये महिलाच जुगाराचा अड्डा चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. करोना काळात जमावबंदी असताना, उल्हासनगरमध्ये एका घरात महिला जुगार खेळत होत्या. पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकून मुख्य सूत्रधार महिला आणि जुगार खेळणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले.
एका घरात महिला जुगार खेळत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्शन २२ मधील एका घरात महिलांकडून जुगाराचा अड्डा चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून इथे महिला जुगार खेळत होत्या. यासंबंधी मध्यवर्ती पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्या अड्ड्यावर धाड टाकली. ४७ हजारांची रक्कम जप्त केली. पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या सात महिलांना अटक केली असून, याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश बंडगर करत आहेत.
उल्हासनगरच्या सेक्शन २२ मध्ये एका महिलेने जुगार अड्डा सुरू केला होता. १८ जानेवारी रोजी संध्याकाळी पोलिसांना माहिती मिळाली होती. मुख्य सूत्रधार या जुगार अड्ड्याची संचालक असल्याचे सांगण्यात आले. पोलीस पथकाने धाड टाकली. सात महिला जुगार खेळताना आढळल्या. या महिलांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात महिलांपैकी दोन महिलांवर आधीच गुन्हे दाखल होते. यात त्यांनी शिक्षाही भोगली आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. महिलांना अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर जामीनावर सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.