अक्षय खासगी कंपनीत काम करतो. पूजा कपड्यांच्या दुकानात काम करायची. वर्षभरापूर्वी अक्षय व तिची दुकानात भेट झाली. प्रेम जुळले. अक्षयने तिला आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन दिले. प्रेम बहरू लागले. दोघांनी लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या. काही दिवसांपूर्वीच अक्षयच्या भावाचे लग्न जुळले. अक्षय आपल्यावर ‘कधी न संपणारे’ प्रेम करतो, या विश्वात पूजा जगत असतानाच अचानक आठ दिवसांपूर्वी त्याने तिच्याशी संपर्क संपुष्टात आणला. तिचा मोबाइल क्रमांकही ब्लॉक केला. पूजाने त्याला भेटण्याचा प्रयत्न केला. ती यशस्वी झाली नाही. पूजा संतापली. सोमवारी रात्री पूजा अक्षयच्या घरी गेली, लग्नाबाबत विचारले. अक्षयने नकार दिला. तिने अक्षयच्या घरातीलच चाकू उचलला. अक्षयवर सपासप चाकूने वार केले. अक्षयने तिच्या तावडीतून सुटका करीत थेट वाडी पोलीस स्टेशन गाठले.
पोलिसांनी जखमी अक्षयला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पूजाविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. मंगळवारी सकाळी मोबाइल लोकशनच्या आधारे फुटाळा तलाव परिसरातून पोलिसांनी पूजाला अटक केली. तिची दोन दिवस पोलिस कोठडी घेतली. ‘अक्षय मला दगा देऊ शकत नाही. आमच्या प्रेमात अक्षयचे नातेवाईक अडथळा घालत आहेत. त्यामुळे तो मला टाळत आहे’, असे पूजा पोलीस कोठडीत पुटपुटत आहे.