गडचिरोली न्यूज: कुरखेडा नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा, आमदार कृष्णा गजबे यांनी राखला गड – bjp flag on kurkheda nagar panchayat was maintained by mla krishna gajbe
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात २० जानेवारी रोजी नऊ नगरपंचायतींचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कुरखेडा नगरपंचायतीवर पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली असून आमदार कृष्णा गजबे यांनी गड राखला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात तीन विधानसभा क्षेत्र असून आरमोरी विधानसभा क्षेत्रावर भाजपचे वर्चस्व आहे. आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात कुरखेडा नगरपंचायती वर १७ पैकी तब्बल ९ जागा जिंकत एक हाती सत्ता मिळविली आहे. तर, शिवसेनेचे ५ , काँग्रेसचे ३ उमेदवार निवडून आले. धक्कादायक! महिलेचं डोकं दुखतंय म्हणून भोंदू हकीमला बोलावलं, बंद खोलीत गुंगीचं औषध दिलं आणि… २०१५ मध्ये ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यावर पहिल्या निवडणुकीत भाजपचे ७, काँग्रेसचे ३, शिवसेनेचे ५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा १ आणि अपक्ष १ उमेदवार निवडून आले होते. आता याठिकाणी भाजपचे ९ नगरसेवक निवडून आल्याने कुरखेडा नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.
विशेष म्हणजे २०१५ मध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांनी मिळून सत्ता स्थापन केले होते. शिवसेनेकडे नगराध्यक्ष पद होते. मात्र, अडीच वर्षानंतर भाजपने सत्ता स्थापन केले. आता पुन्हा एकदा भाजपने १७ पैकी ९ नगरसेवक निवडून आणत एक हाती सत्ता कायम ठेवली आहे. मात्र, शिवसेना आणि काँग्रेसच्या आकडेवारीत काहीही बदल झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या ठिकाणी एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही हे विशेष.