हायलाइट्स:

  • किरण माने हा गरीब शेतकरी कुटुंबातून मुंबईसारख्या शहरात लढायला आलेला मुलगा आहे
  • त्याच्यावर मी अन्याय होऊन देणार नाही

मुंबई : अभिनेते किरण माने यांना तारा प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो‘ या मालिकेतून तडकाफडकी काढल्यामुळे निर्माण झालेल्या वादावर आता तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी गुरुवारी किरण माने आणि स्टार प्रवाहचे कंटेट हेड सतिश राजवाडे या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीला खासदार अमोल कोल्हे यांच्यासह आणखी काही मराठी कलाकारही उपस्थित होते. या भेटीत वादावर ठोस तोडगा निघाला नसला तरी हे प्रकरण समेटाच्या दिशेने जात असल्याची चिन्हे दिसत आहे. त्यासाठी स्टार प्रवाहचे कंटेट हेड सतिश राजवाडे हे ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसच्या लोकांना घेऊन पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी या सगळ्यावर ठोस मार्ग निघण्याची शक्यता आहे.

आजच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारपरिषद घेऊन आपली भूमिका मांडली. किरण माने हा गरीब शेतकरी कुटुंबातून मुंबईसारख्या शहरात लढायला आलेला मुलगा आहे. त्याच्यावर मी अन्याय होऊन देणार नाही. मालिकेतील एका स्त्री ने त्याच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. पण बाकीच्या स्त्रियांनी त्याची बाजू घेतली आहे. त्यामुळे आता या सगळ्या वादाला कोणताही रंग न लावता प्रॉडक्शन हाऊस आणि स्टार प्रवाह वाहिनीने एकत्र बसून यावर तोडगा काढावा. हा तोडगा काढताना कोणावरही अन्याय होणार नाही, हीच माझी भूमिका असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

या बैठकीत सतीश राजवाडे काय म्हणाले, याबाबत आव्हाड यांना विचारणा झाली. तेव्हा आव्हाड यांनी म्हटले की, सतिश राजवाडे यांनी आपण य सगळ्याबाबत अनभिज्ञ असल्याचे म्हटले. मला प्रॉडक्शन हाऊसने किरण माने यांना मालिकेतून काढल्याचे कळवले. त्याउपर मला काहीही माहिती नसल्याचे राजवाडे यांचे म्हणणे आहे. मला यावर फार काही बोलायचे नाही. पण प्रॉडक्शन हाऊसने एखाद्याला नोकरीवरुन काढताना त्याला किमान समज दिली पाहिजे. एका दिवसात नोकरी जाणं हे वेदनादायी आणि अचानक ओझं वाढवणारं असतं, असे आव्हाड यांनी म्हटले.
किरण माने प्रकरणावरून राडे सुरूच; ‘मुलगी झाली हो’चं शूटिंग बंद पाडण्याचा संभाजी ब्रिगेडचा प्रयत्न

होय, चित्रा वाघांना सांगा या सगळ्याचा बोलवता धनी मीच आहे: आव्हाड

किरण माने यांचा बोलवता धनी कोण आहे, हे आम्हाला माहिती असल्याचे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले होते. त्याविषयी विचारले असता जितेंद्र आव्हाड काहीसे संतापले. होय, चित्रा वाघ यांना सांगा किरण माने यांचा ‘बोलविता धनी’ मीच आहे, असे आव्हाड यांनी म्हटले. एखाद्या मालिकेत काय घडतं, हे आम्हाला कसं समजू शकतं, असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला.

हा सगळा वाद गुंतागुतंची आहे. मराठी-अमराठी वादातून हा वाद उद्भवला आहे का, यावर मला काही बोलायचे नाही. पण याप्रकरणाचा गुंता सोडवण्यासाठी आणखी एकदा बैठक घ्यावी लागेल. ‘मुलगी झाली हो’ ही चांगली मालिका आहे. किरण माने यांचं पात्रही लोकप्रिय आहे. त्यामुळे ही मालिका बंद होऊ नये, हीच आमची इच्छा असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

मी या लढाईत विचार करुनच उतरलोय, आता मागे हटणार नाही: आव्हाड

गरिबी काय असते, बापाची नोकरी गेल्यावर काय होतं, हे मी फार जवळून पाहिलं आहे. त्यामुळे मी या वादात फक्त एका गरिबाची बाजू घेतोय. हे भांडण मिटवा, एकत्र व्हा आणि चांगली मालिका सुरु राहू द्या. मी चित्रपट किंवा नाट्यसृष्टीशी संबंधित नाही. पण हे प्रकरण माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आले. किरण माने यांच्यावरील टीकेचा स्रोत पाहिल्यानंतर मी या लढाईत उतरण्याचा निर्णय घेतला. मी एकदा भूमिका घेतली की पाय मागे घेत नाही. माझ्या गेल्या ३५ वर्षांतील राजकीय आयुष्यात असं कधीच घडलेलं नाही. मी विचार करुनच भूमिका घेतो आणि एकदा भूमिका घेतली तर मागे हटत नाही, असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here