हायलाइट्स:
- आयएनएस रणवीर युद्धनौकेवरील स्फोट
- एअर कंडीशनिंग कक्षात गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याची शक्यता
- दुर्घटनेच्या चौकशीसाठी बोर्ड ऑफ इंक्वायरी गठीत केल्याची माहिती
- दुर्घटनेत तीन नौसैनिकांचा मृत्यू, ११ कर्मचारी जखमी
आयएनएस रणवीर या युद्धनौकेवरील स्फोटात तीन नौसैनिकांचा मृत्यू झाला होता. तर ११ जण जखमी झाले होते. एका अधिकाऱ्याने हा स्फोट कशामुळे झाला असावा, याची माहिती दिली आहे. युद्धनौकेवरील एअर कंडीशनिंग कक्षात गॅस गळती झाल्यामुळे हा स्फोट झाला असावा, असे अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी एक ‘बोर्ड ऑफ इंक्वायरी’ची स्थापना केली आहे, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली.
मुंबईत INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट, तीन जवान शहीद
‘आयएनएस रणवीर’ ही मुंबईतील कुलाब्यातील नौदल गोदीत उभी होती. नौका लवकरच गोदीतून रवाना होणार असल्याने त्याची तयारी सुरू होती. त्यामुळेच युद्धनौकेवर अधिकारी व नौसैनिक विविध भागांत कार्यरत होते. मंगळवारी नौकेवरील एका विभागात स्फोट झाला आणि आग लागली. या दुर्घटनेत तीन नौसैनिकांचा मृत्यू झाला. कृष्ण कुमार, सुरिंदर कुमार आणि ए. के. सिंह अशी या अधिकाऱ्यांची नावे असल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले.
‘आयएनएस रणवीर’ या विनाशिकेचा मुख्य तळ पूर्व कमांडअंतर्गत विशाखापट्टणम येथे आहे. नौदलातील युद्धनौका, मोहिमेचा भाग म्हणून एका कमांडमधून दुसऱ्या कमांडमध्ये येत-जात असतात. ‘आयएनएस रणवीर’ याचअंतर्गत अरबी समुद्रातील मोहिमेचा अनुभव घेण्यासाठी मुंबईत आली होती. तिचा मुंबईतील मुक्कामाचा काळ जवळपास संपला असून दोनच दिवसांत ती विशाखापट्टणमसाठी रवाना होणार होती.