हायलाइट्स:

  • आमदार सावकारे वाहन हस्तांतरण प्रकरण
  • आरटीओतील अधिकारी, कर्मचारी पोलिसांच्या रडारवर
  • अटकेतील तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची कार परस्पर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सायबर पोलिसांनी बुधवारी प्रशांत जगन्नाथ भोळे (वय ४० रा. भुसावळ), अशोक विठ्ठल पाटील (वय ५९, रा. खोटेनगर) आणि शेख अकिल शेख रहेमान (वय ४२, रा. भुसावळ) या तीन संशयितांना अटक केली आहे. या तिघांना गुरुवारी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तीनही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (जळगाव क्राईम न्यूज)

भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या नावावर असलेली कार चक्क राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर झाल्याचा धक्कादायक प्रकार ३० डिसेंबर २०२१ रोजी समोर आला होता. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी आमदार संजय सावकारे यांनी या प्रकाराबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांकडे तक्रार करत चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार या प्रकरणात ३१ डिसेंबर रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपींविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

corona update: करोना: दिवसभरात ५२ हजारांवर रुग्ण झाले बरे; आज ४६ हजारांवर नवे रुग्ण

आरटीओतील अधिकारी व कर्मचारीही रडारवर

या गुन्ह्याची अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली होती. तसंच कारवाईबाबत सायबर पोलीस स्टेशनला मार्गदर्शन आणि सूचना देण्यात आल्या होत्या. पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे, सहाय्यक फौजदार बाळकृष्ण पाटील, राजेश चौधरी, प्रवीण वाघ, दिलीप चिंचोले, सचिन सोनवणे, संदीप नन्नवरे, अरविंद वानखेडे, पंकज वराडे याच्या पथकाने गुन्ह्यात बँकांशी पत्रव्यवहार करत तांत्रिक माहिती गोळा करुन संशयित निष्पन्न केले.

Goa Election: भाजपने पर्रिकर यांच्या मुलाला तिकीट का दिले नाही?; मंत्र्याने दिले ‘हे’ कारण

त्यानुसार संशयितांची माहिती मिळविली. यात दोन संशयित भुसावळ तर एक संशयित जळगावातील खोटेनगरातील समोर आल्यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने बुधवारी आरटीओ कार्यालयात सापळा रचून संशयित प्रशांत भोळे, शेख अकिल शेख रहेमान व अशोक पाटील या तिघांना अटक केली. तिघांकडून वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल व कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहे. तिघा संशयितांना गुरुवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आरटीओ कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा या प्रकरणात सहभाग असून अधिकारी व अटकेतील संशयित यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाला असल्याची शक्यता व्यक्त असून संबंधित सायबर पोलिसांच्या रडारवर आहेत.

मोठे रॅकेट सक्रीय असण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरील संगणक प्रणालीमध्ये अनधिकृतपणे प्रवेश मिळवून संबंधितांनी वाहन हस्तांतरणाचा प्रकार केल्याचे समोर आले आहेत. संशयितांनी नेमक्या कोणत्या संगणक तंत्राची मदत घेतली हे पोलीस कोठडीतील चौकशीत समोर येणार आहे. संशयित अशोक पाटील याने त्याच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करत ६ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान वाहन हस्तांतरण केले बाबतचे १२३ संदेश प्राप्त झाल्याचं चौकशीत समोर आलं असून त्याने अनेक वाहनांचे याप्रकारे हस्तांतरण केल्याचा संशय आहे.

काळ्या यादीत टाकलेल्या वाहनांचंही परस्पर हस्तांतरण झाल्याचा संशय आहे. तसंच यात आरटीओ कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा सहभाग असल्याची शक्यता आहे. या गुन्ह्यात संशयितांचं मोठे रॅकेट असल्याचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या कारणांच्या आधारावर पोलिसांनी संशयितांची कोठडी घेतली असून त्यानुसार चौकशीदरम्यान कोठडीत अनेक महत्वाच्या बाबी समोर येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here