हायलाइट्स:
- ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचं निधन
- मुंबईतील नानावटी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
- मराठी पत्रकारितेत ५० वर्षांहून अधिक काळ योगदान
- राजकीय आणि विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
दिनकर रायकर यांना डेंग्यू आणि करोनाचा संसर्ग झाला होता. उपचारानंतर डेंग्यू बरा झाला. त्यानंतर फुप्फुसातील संसर्ग झाला होता. नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. गुरुवारी रात्री त्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आली होती. शुक्रवारी पहाटे त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
५० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत योगदान
दिनकर रायकर यांना पत्रकारिता क्षेत्रात ५० वर्षांहून अधिक अनुभव होता. इंडियन एक्स्प्रेसच्या मुंबई आवृत्तीचे चीफ रिपोर्टर, लोकसत्ताचे सहाय्यक संपादक, दैनिक लोकमत आणि लोकमत टाइम्सच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. सध्या ते लोकमत वृत्तपत्र समूहात समन्वय संपादक म्हणून कार्यरत होते. त्यांना पुढारीकार ग. गो. जाधव पुरस्कार, सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, कृषीवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
राज्याच्या वाटचालीतील अर्धशतकाचा महत्वाचा साक्षीदार हरपला
राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी रायकर यांना श्रद्धांजली वाहिली. ‘ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा अभ्यासक, राज्याच्या वाटचालीतील अर्धशतकाचा महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. दिनकर रायकर यांची पत्रकारिता राज्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, जनसामान्यांना न्याय मिळवून देणारी होती. पत्रकारितेतील अर्धशतकाच्या वाटचालीत त्यांनी राज्यातील अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. राज्याच्या विकासप्रक्रियेत महत्वाचं योगदान दिलं. युवा पत्रकारांना मार्गदर्शन केलं. प्रोत्साहन दिलं. पत्रकारितेत तरुणांच्या पिढ्या घडवल्या. त्यांचं निधन ही राज्याच्या पत्रकारिता, साहित्य क्षेत्राची मोठी हानी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायकर यांना श्रद्धांजली वाहिली.