हायलाइट्स:
- मुंबईतील घाटकोपरमध्ये खळबळजनक घटना
- डोक्यात लाटणे घालून महिलेचा खून
- पाच हजार रुपयांसाठी हत्या केल्याचे उघड
- महिलेला केली अटक, खुनाचा गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, रेखा धोबी असे २५ वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. ५१ वर्षीय ममता उके हिने रेखाची हत्या केली. रेखाचे पती आशिष यांनी २० टक्के व्याजाने ममताकडून ५ हजार रुपये घेतले होते. त्याचे व्याज त्याने दिले होते. मात्र ममताला त्याच्याकडून व्याजाने दिलेले पाच हजार रुपयेही हवे होते. यासाठी ममता वारंवार रेखा आणि आशिषकडे पैशाची मागणी करत होती. ममता ही रेखा हिच्या घरी गेली. तिने पुन्हा पैशांची मागणी केली. त्यांच्यात यावरून बाचाबाची झाली. ममताने रागाच्या भरात घरातील लाटणे घेऊन रेखाच्या डोक्यात प्रहार केले. यात रेखा जखमी झाली. रेखाचा यात मृत्यू झाला. पंतनगर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. २५ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे. तपास केला असता, आरोपी महिलेचा आणि मृत महिलेच्या पतीमध्ये पैशांचा व्यवहार झाला होता. आरोपी महिला ही रेखा यांच्या घरी गेली. आरोपी महिलेने रेखा यांच्या डोक्यात लाटणे घातले. यात ती जखमी झाली होती. बेशुद्ध झाल्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तिचा मृत्यू झाला, असे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आरोपी महिलेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.
आरोपी महिला ही घरी आली होती. पैशांची वारंवार मागणी करत होती. आरोपीने रेखा यांना सुरुवातीला लाटण्याने मारहाण केली. त्यावर दोन-तीन दिवसांत पैसे देते असे रेखा हिने सांगितले. पण तरीही तिने काहीही ऐकून घेतले नाही. तिने मारहाण केली. त्यानंतर केसांना पकडून आपटले. यात रेखा ही बेशुद्ध पडली. रुग्णालयात नेल्यानंतर तिचा मृत्यू झाला, असे प्रत्यक्षदर्शी आणि रेखाची नातेवाइक अश्विनी गमरे हिने सांगितले.