हायलाइट्स:
- डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारली नथुराम गोडसेची भूमिका
- राष्ट्रवादी काँग्रेसने मांडली स्पष्ट भूमिका
- शरद पवार यांच्या भूमिकेनंतर भाजपची टीका
- सिनेमा नक्कीच निषेधार्ह – राष्ट्रवादी काँग्रेस
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका केल्यानंतर जो वाद निर्माण झाला आहे, त्यावर जयंत पाटील यांनी पक्षाची रोखठोक भूमिका माध्यमांशी बोलताना मांडली. नथुराम गोडसे यांच्या उदात्तीकरणाचा कोणताही सिनेमा येत असेल, तर त्याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. हा सिनेमा मी पाहिला नाही किंवा त्यांची भूमिकाही. राष्ट्रवादीत येण्याअगोदर ही भूमिका अमोल कोल्हे यांनी केली आहे. मात्र, त्याचे प्रदर्शन इतक्या उशिरा का होतेय हे माहीत नाही, असेही पाटील म्हणाले.
“कलाकार म्हणून अमोल कोल्हेंच्या भूमिकेकडे पाहिलं पाहिजे”; शरद पवारांनी केली पाठराखण
या भूमिकेवर लोकांच्या प्रतिक्रिया व भावना व्यक्त होत आहेत, त्या चुकीच्या नाहीत. परंतु एक कलाकार म्हणून त्यांनी २०१७ साली ती भूमिका साकारली आहे. राष्ट्रवादीत ते त्यानंतर आले आणि लोकसभेची निवडणूक जिंकले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका करून ते घराघरात पोहोचले. शिवाय लोकसभेत शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन भाषणेही केली आहेत, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. तो सिनेमा बघण्याची व वेळ घालवण्याची आवश्यकता नाही आमची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
…आता गोडसेवादी पार्टी म्हणा – भाजप
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मुद्द्यावर भूमिका मांडल्यानंतर भाजपने टीका केली आहे. शरद पवार यांच्या खुलाशानंतर आता राष्ट्रवादी पार्टी नव्हे, तर गोडसेवादी पार्टी म्हणा, असे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले. थेट खासदारच गोडसेचे उदात्तीकरण करणार, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांवरही निशाणा साधला. छगन भुजबळ यांची जुनी भाषणे लोकांच्या लक्षात आहेत. तसेच विचार पटले नाही म्हणून बंगल्यावर नेऊन मारहाण करणारे मंत्री राष्ट्रवादीचेच आहेत. बाकी राष्ट्रवादीच्या खासदारांनी नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. त्यामुळे कुठल्याही विषयावर भाजपला उपदेशाचे डोस पाजणारे सर्व पुरोगामी आता गप्प आहेत. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे दाखले दिले जातील, अशी टीकाही त्यांनी केली.