औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा रद्द केल्याचे बनावट परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं एकच गोंधळ उडाला. परीक्षा रद्द करण्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. करोना संचारबंदीचा कालावधी अनिश्चित असल्यामुळे विद्यार्थ्यांना सरसकट “प्रमोट” करून परीक्षा रद्द करावी, अशी मागणी ‘मास’ संघटनेने राज्यपाल आणि उच्च शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पदवी आणि पदव्युत्तर वर्गाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या. १७ मार्चपासून पदवी आणि ३१ मार्चपासून पदव्युत्तर परीक्षा होणार होती. विद्यापीठाशी संलग्नित चार जिल्ह्यांत २२३ परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यानंतर आता १४ एप्रिलनंतर परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे विद्यापीठाने जाहीर केले होते. मात्र, रविवारी सोशल मीडियावर विद्यापीठाच्या नावाचे बनावट परिपत्रक व्हायरल झाले. विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा रद्द केल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. विद्यापीठाच्या जुन्या परिपत्रकात खाडाखोड करून हे बनावट परिपत्रक फिरवल्याचे नंतर स्पष्ट झाले. चार जिल्ह्यांतील तब्बल चार लाख विद्यार्थी परीक्षेच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत. परिपत्रकामुळे एकच गोंधळ उडाला. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

करोना संचारबंदी १५ एप्रिलनंतरही अनिश्चित काळासाठी कायम राहण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी योग्य अंतर राखण्यासाठी परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गासाठी “प्रमोट” करण्याची मागणी मराठवाडा असोसिएशन फोर स्टुडंट्स या संघटनेचे अध्यक्ष डॉ. उल्हास उढाण यांनी केली. याबाबत त्यांनी राज्यपाल आणि उच्च शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. करोनाला रोखण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेसह सामाजिक विलगीकरण आवश्यक आहे. या साथीमुळे विद्यार्थी गावी रवाना झाले आहेत. परीक्षा घेण्याचा कालावधी उलटल्यानंतर परीक्षा कधी होणार आणि आमचे शैक्षणिक भवितव्य काय असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक अवस्थेचा विचार करून राज्यपालांनी तातडीने निर्णय घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.

कुलसचिव यांचे परिपत्रक

येत्या १४ एप्रिलपर्यंत आपत्कालीन परिस्थिती म्हणून विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे कामकाज बंद आहे. प्राध्यापकांनी वेळेचा योग्य उपयोग शैक्षणिक कार्यासाठी करावा, असे कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सोमवारी (३० मार्च) काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. या परिपत्रकात परीक्षेचे वेळापत्रक किंवा परीक्षा रद्द झाल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे हा निर्णय १४ एप्रिलनंतरच होईल हे स्पष्ट झाले आहे.

चार लाख विद्यार्थी कुठे बसणार ?

डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे चार लाख विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर येतील. या विद्यार्थ्यांची गर्दी झाल्यानंतर सामाजिक अंतर राखणे कमी होईल. त्याचे दुष्परिणाम होण्याची भीती आहे. परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी परीक्षा विभागाला अडीच महिन्यांचा अवधी लागतो. ते शक्य नसल्याने परीक्षा रद्द करावी, असे उढाण यांनी म्हटले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here