हायलाइट्स:
- डॉ. अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार
- अमोल कोल्हे यांच्यावर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून टीका
- भाजपनेही राष्ट्रवादीवर साधला निशाणा
- शरद पवार यांनी पहिल्यांदाच मांडली भूमिका
डॉ. अमोल कोल्हे यांनी २०१७ मध्ये एका चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारली होती. तो चित्रपट आता प्रदर्शित होत आहे. याबाबत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, तसेच सोशल मीडियावरून टीका होत आहे. त्यानंतर आता प्रथमच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमोल कोल्हे यांनी ही भूमिका एक कलावंत म्हणून केली आहे. कोल्हे यांनी ही भूमिका ज्यावेळी केली, त्यावेळी ते आमच्या पक्षातही नव्हते. कलावंत म्हणून त्यांनी ही भूमिका केली म्हणजे याचा अर्थ त्यांनी गांधीजींच्या विरोधात काही केले असा होत नाही. नथुराम गोडसेने जे केले, ते सगळ्या देशाला माहीत आहे. कलावंत आणि देशातील इतिहास या दोन्ही गोष्टींना समोर ठेवून आपण बघितलं पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
“कलाकार म्हणून अमोल कोल्हेंच्या भूमिकेकडे पाहिलं पाहिजे”; शरद पवारांनी केली पाठराखण
या मुद्द्यावरून भाजपनेही टीका केली आहे. त्यावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप हे गांधीवादी कधीपासून झाले? असा सवाल त्यांनी केला. भाजप आणि आरएसएस यांचा जुना इतिहास यांच्याबद्दल मी भाष्य करणार नाही. एक काळ असा होता होता की गांधींबाबत वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या, त्या शक्ती सध्या कुठे आहेत, हे बघितले पाहिजे. त्याबाबत त्यांनी बोलावं, असे उत्तर शरद पवार यांनी दिले.
अमोल कोल्हे काय म्हणाले?
अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली असून, त्यावर सोशल मीडिया, राजकीय नेते आणि कार्यकर्ते टीका करीत आहेत. परंतु ‘पडद्यावरील भूमिका आणि राजकीय भूमिका यात गल्लत करू नका,’ अशी प्रतिक्रिया कोल्हे यांनी दिली आहे. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ असे या सिनेमाचे नाव असून, येत्या महिनाअखेरीस तो ओटीटीवर (ओव्हर द टॉप) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे ट्रेलर आल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादीची भूमिका
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केल्यानंतर जो वाद निर्माण झाला आहे, त्यावर जयंत पाटील यांनी पक्षाची रोखठोक भूमिका माध्यमांशी बोलताना मांडली. नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणाचा कोणताही सिनेमा येत असेल, तर त्याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली आहे. हा सिनेमा मी पाहिला नाही किंवा त्यांची भूमिकाही. राष्ट्रवादीत येण्याअगोदर ही भूमिका अमोल कोल्हे यांनी केली आहे. मात्र, त्याचे प्रदर्शन इतक्या उशिरा का होतेय हे माहीत नाही, असेही पाटील म्हणाले.