हायलाइट्स:
- डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारली नथुराम गोडसेची भूमिका
- काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया
- उदात्तीकरण कदापि खपवून घेणार नाही, पटोलेंचा इशारा
- कोल्हेंनी जबाबदारीने वागणे गरजेचे – नाना पटोले
डॉ. कोल्हे यांनी एका सिनेमात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. २०१७ मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. मात्र हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होत आहे. डॉ. कोल्हे यांनी साकारलेल्या या भूमिकेनंतर वाद निर्माण झाला आहे. त्यांच्यावर टीका होत आहे. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले की, डॉ. अमोल कोल्हे कलाकार असले तरी, ते एका पक्षाचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी अधिक जबाबदारीने वागण्याची अपेक्षा आहे. कलाकार म्हणून मिळालेल्या स्वातंत्र्याच्या दुरुपयोग करुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन आणि नथुरामचे उदात्तीकरण करणे हे दुर्दैवी आहे. नथुराम गोडसेला नायक बनवण्याचा हा प्रयत्न चुकीचा पायंडा पाडणारा आहे. याआधीही काही कलाकारांनी गोडसेच्या भूमिका केल्या, त्यावरही लोकांनी तीव्र नापसंती व संताप व्यक्त केला होता. डॉ. कोल्हे नथुरामची भूमिका करण्याबद्दल देत असलेले स्पष्टीकरण अत्यंत तकलादू व न पटणारे आहे.
नथुरामच्या भूमिकेबद्दल भारतीय जनता पक्षाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया काही नवीन नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व नथुराम गोडसेबद्दलचे विचार सर्वांना माहीत आहेत. परंतु डॉ. कोल्हे यांनी नथुरामची भूमिका करून गांधी हत्येचे एकप्रकारे समर्थनच केले आहे. डॉ. कोल्हे आता कितीही सारवासारव करत असले तरी, त्याला काहीही अर्थ नाही, असे पटोले म्हणाले. देशातील एका विशिष्ट विचारसरणीचे लोक सातत्याने नथुरामला जिवंत करुन महात्मा गांधींचा अपमान करत असतात. परंतु ७५ वर्षानंतरही महात्मा गांधींच्या विचारांचे महत्व कमी झालेले नाही, उलट जगातील विविध देश महात्मा गांधींच्या विचाराचा वारसा घेऊन वाटचाल करत आहेत. ही त्यांच्या विचाराची ताकद आहे. आपल्याच देशातील काही लोक मात्र महात्मा गांधींचे विचार पुसण्याचे काम करत आहेत. परंतु गांधी विचार व त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान जनता विसरलेली नाही व विसरणारही नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
“कलाकार म्हणून अमोल कोल्हेंच्या भूमिकेकडे पाहिलं पाहिजे”; शरद पवारांनी केली पाठराखण