हायलाइट्स:
- रत्नागिरीत दापोली तालुक्यातील कोळथरे गावात धक्कादायक प्रकार
- मुंबईतून गावी परतल्यानंतर १५ दिवसांनी चोरी झाल्याचे आले निदर्शनास
- ओळखीतील व्यक्तींनी चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज
- दाभोळ पोलीस ठाण्यात सोमण कुटुंबीयांची तक्रार
याबाबत शुक्रवारी २१ जानेवारी रोजी दाभोळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी दाभोळ पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
कोळथरे येथील प्रकाश रामचंद्र सोमण (वय ५५) यांनी या प्रकरणी दाभोळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. एकूण सहा लाख पाच हजार रुपये किंमतीचे दागिने चोरीस गेले आहेत. चोरी होऊन १५ हून अधिक दिवस उलटले. त्यानंतर घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कोळथरे ब्राह्मण आळी येथील सोमण कुटुंबीय २५ डिसेंबरला दोन दिवसांसाठी मुंबईत गेले होते. यावेळी अर्थातच घर व कपाट लॉक करून ते बाहेर पडले होते. मुंबईहून आल्यावर घरात सगळ्या वस्तू जागेवर होत्या. त्यामुळे हा प्रकार समजू शकला नाही. १६ जानेवारी रोजी शेजारी हळदी कुंकूचा कार्यक्रम होता. मंगळसूत्र हवा असल्याने कपाट उघडले तेव्हा, ते मिळाले नाही. म्हणून इतरत्र शोधाशोध सुरू झाली. इतर दागिनेही गायब होते. त्यावेळी चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला.
कपाटातील लॉकरमध्ये असलेले सात तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चेन, सोन्याची अंगठी, तीन तोळ्याच्या बांगड्या, दोन तोळ्यांचा सोन्याचा नेकलेस असा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणी अधिक तपास तपास दाभोळ पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ करीत आहेत.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times