हायलाइट्स:
- ठाण्यातील उपवन परिसरात दुर्दैवी घटना
- दोन अल्पवयीन मुलांचा डबक्यात बुडून मृत्यू
- वर्तक नगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे पश्चिमेकडील उपवन परिसरातील रामबागजवळील एका मोठ्या डबक्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. गौतम वाल्मिकी (वय १२) आणि निर्भय चौहान (वय १५) अशी दोघांची नावे आहेत. हे दोघेही नातेवाइक आहेत. निर्भय हा दोन दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातून गौतमच्या घरी ठाण्यात आला होता. येथील मोठ्या डबक्यात दोघेही पोहोयला गेले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर टीडीआरएफ पथक, वर्तक नगर पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि अग्निशमन कर्मचारी आपत्कालीन वाहन आणि रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले. या डबक्यात मुलांचा शोध घेण्यात आला. शोधमोहीमेदरम्यान दोघांचेही मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले असून, ते वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. गौतम शास्त्रीनगर येथील रहिवासी होता. निर्भय हा उत्तर प्रदेशातून ठाण्यात गौतमच्या घरी आला होता.
पाण्याने भरलेल्या याच खड्ड्यामध्ये गेल्या महिन्यात, ५ डिसेंबर रोजी अभिषेक शर्मा आणि कृष्णा गौड या दोन अकरा वर्षांच्या मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. महिनाभरातील ही दुसरी घटना आहे.