नागपूर : ‘दैनंदिन सुमारे पाच हजारांची रुग्णवाढ हा चिंतेचा विषय आहे. जानेवारीच्या अखेरीस करोनाचा उच्चांक असू शकतो. मात्र, फेब्रुवारीत बाधितांच्या संख्येत घट दिसेल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे तूर्तास नागपुरात कडक निर्बंध लागणार नाहीत’, अशी माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

नागरिकांनी घाबरू नये. दवाखान्यात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. मृत्युदरही आटोक्यात आहे. नागपूर जिल्ह्यात मेडिकल, मेयो व गरजा पडल्यास एम्समध्ये आजच्या स्थितीला सतरा हजारांवर खाटांची उपलब्धता आहे. ऑक्सिजनची क्षमता देखील कोणत्याही आणीबाणीला तोंड देण्यास पुरेशी आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.

पालकमंत्र्यांनी शनिवारी कोव्हिड व्यवस्थापनासंदर्भात वरिष्ठ अधिकारी तसेच टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. नागपूरमध्ये रोजची रुग्णवाढ पाच हजारांच्या घरात आहे. अशावेळी बाधितांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. यावेळी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. विजय मगर, वाहतूक विभागाचे उपायुक्त सारंग आव्हाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर याशिवाय विविध विभागांचे विभागप्रमुख तसेच प्रमुख हॉस्पिटलचे अधिष्ठाता, टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. दरम्यान, आरोग्य सुविधा पुरविण्यास प्रशासन कमी पडत आहे, असे लक्षात आल्यास नागपुरात कडक निर्बंध लावण्यात येणार असल्याचे डॉ. राऊत म्हणाले.

Coronavirus Update : दोन्ही डोस घेऊनही करोनाची लागण झालेल्यांची संख्या जास्त
‘मी सुरक्षित, माझे नागपूर सुरक्षित’

गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. लक्षणे दिसली तर चाचणी करा. मास्क अनिवार्य आहे, तो लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका. लसीकरणाशिवाय करोनापासून बचाव नाही. त्यामुळे तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत ज्या गटामध्ये मोडत असाल त्या लसीकरणाचा ताबडतोब लाभ घ्या. करोनाची लागण झाली असेल तर विलगीकरण करा, काळजी घ्या. प्रशासन सर्व सुविधा पुरविण्यास तयार आहे. ‘मी सुरक्षित, माझे नागपूर सुरक्षित’ या अभियानाला स्वयंशिस्तीने प्रतिसाद द्या, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

इतर महत्त्वाचे…

-शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय २६ जानेवारीनंतर घेण्यात येईल.

– सेल्फ किटच्या नोंदी काटेकोर ठेवण्याचे निर्देश.

-लसीकरण न झालेल्यांची शोध मोहीम राबविण्यात येईल.

-सोमवारी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांसोबत पालकमंत्री चर्चा करतील.

-कोव्हिड सुविधाविषयक डॅशबोर्ड पोर्टल सुरू करणे, कोव्हिड केअर मॅनेजमेंट सिस्टीम सुरू करण्याचे निर्देश.

दूध संघ कोणाकडे?, सात जागांसाठी १०० टक्के मतदान; आज निकाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here