नांदेड : देशात करोना लसीकरणाला सुरुवात होऊन आता एक वर्ष उलटल आहे. मात्र, नांदेडमध्ये लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवलेली असल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. नांदेड महापालिकेच्या हद्दीत आजपर्यंत लसीचा पहिला डोस ७० टक्के नागरिकांनी घेतला आहे तर दुसरा डोस अवघ्या ४६ टक्के नागरिकांनीच घेतला आहे. त्यामुळे लसीकरणाकडे पाठ फिरवलेल्या या नागरिकांची शोध मोहीम राबवण्याची वेळ आरोग्य विभागावर आली आहे.

नांदेडमध्ये गेल्या चोवीस तासात करोनाचे नव्याने ८५७ बाधित रुग्ण आढळले आहेत. सध्या नांदेडमध्ये एकूण चार हजार पन्नास रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील समाधानाची बाब म्हणजे लस घेतलेल्या करोनाबाधित आढळलेल्या रुग्णांना फारशी तीव्र स्वरूपाची लक्षणे नाहीत. मात्र, ज्यांचे लसीकरण बाकी आहे त्यांना थोडी अधिकची लक्षणे जाणवत आहेत अशी माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी दिली आहे.

‘लसीकरणामुळे करोनाचा धोका कमी होतोय असा आमचा अनुभव आहे, त्यामुळेच आम्ही नागरिकांना वारंवार लसीकरण करून घेण्यासाठी आग्रह करतोय’ असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलीस कर्मचाऱ्यांना धडकी! पुढचे २ महिने पगारातून कपात होणार ३५ ते ५० हजार रुपये
जिल्हा शल्य चिकित्सक करोना बाधित

नांदेडमध्ये कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अत्यंत प्रभावीपणे निळकंठ भोसीकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून जवाबदारी सांभाळलीय. या दरम्यान त्यांना आता दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, त्यांचे लसीकरण झालेले असल्यामुळे काही दिवस घरी राहून त्यांनी काम सांभाळले आणि आता ते पुन्हा कर्तव्यावर रुजू होतायत.

जेष्ठ नांदेडकराना आवाहन

नांदेडमध्ये बूस्टर डोसचे पात्र असलेल्या १२ हजार ५५५ लाभार्थ्यांनी अद्याप लस घेतलेली नाही. सहव्याधी असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना बूस्टर डोसचा चांगलाच फायदा होतोय, त्यांची प्रतिकार शक्ती मजबूत होताना दिसत आहे. त्यामुळे बूस्टर डोससाठी पात्र असणाऱ्या नागरिकांनी लसीचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे.

नांदेड करोना आकडेवारी

नांदेडमध्ये आतापर्यंत ९७७०९ इतक्या लोकांना करोनाची बाधा झाल्याचे आढळले आहे. त्यापैकी ९१ हजार एक रुग्णाला उपचारानंतर घरी सोडण्यात आलेलं आहे. तर एकट्या नांदेड जिल्ह्यात २६५८ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या चार हजार पन्नास बाधितांवर उपचार सुरू असून त्यापैकी तिघे जण अत्यवस्थ आहेत. यात समाधानाची बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांहून अधिक आहे.

पुढील ८ दिवसांत करोनाचा धोका वाढण्याची शक्यता, पालकमंत्र्यांची माहिती
प्रशासनाच्या उपाययोजना

लसीकरण वाढवण्यासाठी नांदेडमध्ये काही उपाययोजना राबवण्याची मोहीम जिल्हाधिकाऱ्यानी जाहीर केली होती. त्यात लसीकरण नसेल तर पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही. मद्याच्या दुकानातून मद्य मिळणार नाही याचा त्यात प्रामुख्याने समावेश होता. मात्र, कुठल्याही पेट्रोल पंपावर किंवा मद्याच्या दुकानात ग्राहकाच्या लसीकरणाबाबत साधी विचारणा देखील होत नाही. आता लस घेतली नसेल तर शासकीय कार्यालयात प्रवेश नाही अशी एक घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here