मुंबई: करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेत शेतकरी, नोकरदार अशा सर्वच घटकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला असला तरी लॉकडाऊनदरम्यान दुकाने बंद ठेवणाऱ्या दुकानदारांचा मात्र सर्वांनाच विसर पडला असून आमच्यावर अन्याय का?, असा प्रश्न दुकानदार विचारत आहेत.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात हा लॉकडाऊन जाहीर होण्याआधीपासूनच संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईसह सर्वच शहरांतील बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने वगळता महाराष्ट्रात एकही दुकान उघडे नाही. या स्थितीमुळे दुकानदारांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. दुकानदार तसेच त्यांच्याकडे तुटपुंज्या वेतनावर काम करणारे नोकर, या सर्वांसाठीच येणारा काळ आर्थिक चणचणीचा असणार आहे.

अनेक दुकानदार आज कर्जबाजारी आहेत. त्यातही बहुतांश दुकाने भाडेतत्वावर घेतलेली असतात. छोट्या दुकानदाराचे कुटुंबही भाडेतत्वावरील घरातच रहात असतं. लॉकडाऊनमुळे दुकानच बंद असल्याने घरखर्च कसा भागवायचा, कर्जाचे हप्ते कसे भरायचे, घरभाडे कसे द्यायचे, कामगारांना पगार कुठून द्यायचा, असे अनेक प्रश्न दुकानमालकांपुढे उभे ठाकले आहेत. ही बाब ध्यानात घेऊन बंदच्या काळात दुकानदारांकडून कोणत्याही प्रकारचे कर्जाचे हप्ते घेण्यात येऊ नयेत, तसेच केंद्र सरकारने अन्य घटकांप्रमाणे दुकानदारांनाही काही प्रमाणात आर्थिक मदत करावी, असे आर्जव दुकानदारांकडून करण्यात आले आहे. एका सामान्य दुकानदाराने याबाबत मुख्यमंत्र्यांना खुलं पत्र लिहिलं असून त्यातून दुकानदारांच्या व्यथा मांडल्या आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here