हायलाइट्स:
- रिपोर्टर चाँद नवाब यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल
- कराचीतील वादळाचं वृत्तांकन
- ‘अंगकाठीनं बारिक असलेल्या लोकांनी आज समुद्रकिनारी येऊ नये…’
तुम्हाला अभिनेता सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान‘ सिनेमातील रिपोर्टर चांद नवाब चांगलाच लक्षात असेल… सिनेमातील हे अजब व्यक्तीमत्व पाकिस्तानातील एक रिपोर्टर चाँद नवाब यांच्याशी मिळतं-जुळतं होतं. चाँद नवाब हे पाकिस्तानच्या कराची शहरातील एक व्हिडिओ पत्रकार आहेत ज्यांच्या अनोख्या रिपोर्टिंग स्टाईलचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता पुन्हा एकदा चाँद नवाब यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय.
यावेळी, चाँद नवाब कराचीच्या समुद्र किनाऱ्यावर आलेलं वाळुच्या वादळाचं वृत्तांकन करण्यासाठी दाखल झाले होते. जोरदार हवा आणि हवेतील रेती अंगावर झेलत चाँद नवाब कॅमेऱ्यासमोर इथल्या दृश्यांचं वर्णन करताना व्हिडिओत दिसून येत आहेत.
‘कराचीचं हवामान सध्या अतिशय आल्हाददायक आहे. थंडगार वारे वाहत आहेत. हे वादळ पाहण्यासाठी शहरातून लोक इथे दाखल होत आहेत… माझे केस उडत आहेत, तोंडात धूळ जातेय, मला डोळेही उघडता येत नाहीत… अंगकाठीनं बारिक असलेल्या लोकांनी आज समुद्रकिनारी येऊ नये, नाहीतर ते वार्यासोबत उडून जाऊ शकतात’ असं या व्हिडिओत म्हणताना चाँद नवाब दिसत आहेत.
इथे वातावरण इतकं सुंदर आहे की तुम्हाला मध्य-पूर्वेत जाण्याची गरजही भासणार नाही, असं म्हणणारे चाँद नवाब कराचीच्या समुद्र किनाऱ्यावर उंटाच्या स्वारीची मजाही घेताना दिसत आहेत.
यापूर्वीही चाँद नवाब यांनी पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांची मुलाखत घेतली होती. याचाही एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत होता. या व्हिडिओत गोल्फ खेळणाऱ्या राष्ट्रपतींसोबत चर्चा करताना चाँद नवाब दिसले होते.