हायलाइट्स:
- जिल्ह्यात दैनंदिन करोनाबाधित आणि उपचाराधीन रुग्णांची वाढ कायम
- २४ तासांत नव्या एक हजार ५७३ रुग्णांची भर
- मंगळवारी होणार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक
गेल्या दोन आठवड्यांपासून नगर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढीला सुरूवात झाली आहे. राज्यात काही भागात आकडे स्थिरावले, तर काही ठिकाणी कमीही झाले. मात्र, नगर जिल्ह्यात वाढ कायम आहे. गेल्या आठवड्यात दैनंदिन रुग्ण संख्या बाराशे ते दीड हजाराच्या आसपास कायम राहिली. त्यामुळे घरी सोडण्यात येणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सुदैवाने रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या आणि गंभीर रुग्णांची संख्याही कमीच आहे. जवळपास ९० टक्के रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे होत असल्याचं दिसून येत आहे. मृत्यूंचे प्रमाणही तुलनेत कमी आहे. असं असलं तरी प्रशासनाने दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे.
शहरासोबतच ग्रामीण भागातील रुग्णसंख्याही वाढत असल्याने तालुकास्तरावरील कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऑक्सिजनची मागणी अद्याप वाढलेली नाही. तरीही सर्व ऑक्सिजन प्रकल्पही तयार ठेवण्यात आले आहेत. दुसऱ्या लाटेत नगर जिल्ह्याला विपरित परिस्थितीला सामारे जावं लागलं होतं. त्यामुळे आता प्रशासनाने वेळीच दक्षता घेतली आहे.
राज्यात मात्र वेगळं चित्र आहे. मुबंईसह काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात येत असून अनेक निर्बंधही शिथील करण्यात आले आहेत. पुण्यात मात्र महिना अखेरपर्यंत प्रतीक्षा करण्यात येणार आहे. शाळा सुरू करण्यासंबंधीचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आला आहे. त्यानुसार नगरच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. त्यामध्ये शाळासंबंधीचा निर्णय घेतला जाणार आहे. एका बाजूला दक्षता घेऊन शाळा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे करोना रुग्णांचे आकडे वाढतच आहेत. या पार्श्वभूमीवर बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागलं आहे.
लसीकरणाला वेग
रूग्णसंख्या वाढत असल्याने लसीकरणाने पुन्हा वेग घेतला आहे. जिल्ह्यात ३८ लाख ४२ हजार नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यापैकी ३१ लाख, ५३ हजार नागरिकांनी पहिला डोस तर २० लाख २१ हजार नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. मुलांचे लसीकरण तुलनेत जास्त वेगाने होत आहे. पात्र मुलांपैकी सुमारे ५० टक्के मुलांचं लसीकरण झालं आहे.