Tweet : @MTjitendra
तुम्ही राजकुमारचा ‘तिरंगा’ पाहिलाय? (कर्फ्यूत घरी बसून इतक्या दिवसांत नक्कीच पाहून झाला असेल) त्यातला इन्स्पेक्टर ‘वागले’ (वागळे), म्हणजेच नाना पाटेकरचा संवाद आहे, ‘अपना तो उसूल है, पहले लाथ, फिर बात; और जरूरत पडे, तो मुलाकात…!’ आताच हा संवाद आठवण्याचे कारण म्हणजे, कर्फ्यूमध्ये पोलिसांकडून कोणतीही चौकशी न होता, थेट काठ्या खाल्ल्याचे किस्से शहरभरातून कानी येत आहेत. अनेक परिसरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद का आहेत, अशी विचारणा करता एका व्यापाऱ्याने, ‘कामावर येताना ठिकठिकाणी पोलिसांच्या काठ्या खाव्या लागत असल्याने, भीतीमुळे कामगारच कामावर येत नाहीत,’ हेच कारण सांगितले. ‘पण पोलिसांनी व्हॉट्सअॅप क्रमांक दिलेत आणि त्यावर डिजिटल परवानगी देण्यात येत आहे ना,’ असे विचारता, ‘एक तर बहुसंख्य कामगार गरीब-अशिक्षित असून, त्यांना ही सिस्टिम कळतही नाही आणि मुख्य म्हणजे मोबाइल काढून ही परवानगी दाखवेपर्यंत, एखाद-दुसऱ्या काठीचा प्रसाद खावा लागतो,’ असे वास्तव त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांपासून ते जिल्हा प्रशासन आणि वरिष्ठ अधिकारीही वारंवार आवाहन करीत असले, तरी रस्त्यावरील पोलिसांपैकी एखादा ‘वागळे’ झाल्याचा एक तरी किस्सा कानी पडतच आहे. एकीकडे अत्यावश्यक कामासाठी निघालेल्यांची ही अडचण असतानाच, दुसरीकडे विनाकारण भटकणारी मंडळीही बिनदिक्कत रस्त्यांवरून फिरत असल्याने तिथे पोलिसी खाक्या हवाच; असेही अनेकांचे मत पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात ‘लॉकडाउन’ शब्द येताच, शहरभर दुकानांबाहेर लागलेल्या रांगा पंतप्रधानांसह सर्वांनी खुलासे केल्यानंतर कमी झाल्या आहेत.
कर्फ्यूच्या पाचव्या दिवशी, गुरुवारी शहरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. मध्यवस्ती आणि धनकवडी, पद्मावती अशा काही उपनगरांमध्ये किराणा आणि औषधे घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. तेथेही सुरक्षित अंतर ठेवून आखलेल्या पट्ट्यांवरूनच सावधगिरी खरेदी करण्यात येत होती. सकाळी काही काळ शिथिल झालेले वातावरण काही तासांतच ओसरले आणि पुन्हा शुकशुकाट झाला. सहकारनगर, तळजाई अशा परिसरातील प्रमुख रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून बंद केले होते आणि चौकशी करूनच नागरिकांना सोडण्यात येत होते. कर्वे रस्ता, डेक्कन जिमखाना आणि फर्ग्युसन रस्ता असे कायम गजबजलेले रस्ते निर्जन भासत होते. सायंकाळनंतर तर ही शांतता भयाण वाटू लागली. रात्रीचे दहा वाजले, तरी मध्यरात्रीचा भास होऊ लागला आणि रस्त्यांवर फक्त भटक्या कुत्र्यांचे राज्य आले. नेहमी वाहतुकीच्या कोंडीला कंटाळलेल्या अनेकांना, अशा निर्जन रस्त्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या एखाद्या कारचीही ‘सोबत’ भासू लागली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मुदत वाढवली नाही, तर आणखी १९ दिवस असेच काढायचे आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times