हायलाइट्स:

  • नेपाळी गायिकेने अंबरनाथच्या महिलेची केली फसवणूक
  • किडनी विकून ४ कोटी मिळवून देण्याचे आमिष
  • साडेआठ लाख रुपयांचा घातला गंडा
  • अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल

अंबरनाथ : एका नेपाळी गायिकेने सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीला किडनी विकून ४ कोटी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवत साडेआठ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक केलेली नाही.

मूळच्या नेपाळच्या असलेल्या कल्पना मगर या अंबरनाथला त्यांचे पती आणि मुलांसह वास्तव्याला आहेत. त्यांचे पती वॉचमन म्हणून काम करतात, तर कल्पना या धुणीभांडी करून त्यांच्या चार मुलांचं पालन पोषण करत आहेत. कल्पना या नेपाळमध्ये असताना २०१९ साली नेपाळी गायिका रुबिना बादी यांच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. २०२० साली त्या भारतात राहायला आल्यानंतर त्यांनी फेसबुकवर रुबिना बादी यांना शोधून त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. यानंतर रुबिना बादी यांच्याशी चॅटिंग करू लागल्यानंतर कल्पना यांनी तिला आपली आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचं सांगितले. त्यावर रुबिनाने कल्पना यांना आपण आता दिल्लीत राहायला आलो असून, किडनी विकल्यानं आपल्याला ४ कोटी रुपये मिळाल्याचे सांगितले. तसंच तुलाही तुझी किडनी विकायची असल्यास १० लाख रुपये डिपॉझिट म्हणून द्यावे लागतील, त्यानंतर तुला परदेशात नेऊन तुझी किडनी काढली जाईल, अशी बतावणी केली.

पोलीस शाळा प्रशासन बॉम्बने उडवण्याची मेलद्वारे धमकी; पोलिस दलात खळबळ
कल्याणनजीकच्या गावातील नागरिकांचा जीव धोक्यात, नदीवरील धोकादायक पुलामुळे जीव टांगणीला

तिने दाखवलेल्या आमिषाला बळी पडत कल्पना यांनी रुबिना हीचे पती अरविंद कुमार यांच्या खात्यात मे २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत साडे आठ लाख रुपये ट्रान्सफर केले. मात्र त्यानंतर आपली किडनी कधी विकली जाईल? अशी विचारणा कल्पना यांनी केली असता, रुबिना आणि तिच्या पतीने टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे कल्पना मगर यांनी सामाजिक कार्यकर्ते भारत सोनार यांच्या मदतीने थेट दिल्ली गाठत बँकेतून अरविंद कुमार यांचे डिटेल्स मिळवले आणि दिल्ली पोलिसांकडे धाव घेतली. दिल्ली पोलिसांनी अरविंद कुमार आणि रुबिना बादी या दोघांनाही पोलीस ठाण्यात आणल्यानंतर या दोघांनी १५ दिवसांत सगळे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले, मात्र पुन्हा टाळाटाळ सुरू केल्याने कल्पना मगर यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी नेपाळी गायिका रुबिना बादी आणि तिचा पती अरविंद कुमार या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मात्र यानंतर पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित महिला कल्पना मगर यांनी केला आहे.

१४ वर्षांनंतर भरपाई;मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाच्या निकालाने कुटुंबाला मिळाला न्याय

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस दिल्लीला सुद्धा जाऊन आले. मात्र त्यांनी आरोपींना अटक केली नसल्याचा आरोप केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे सामाजिक कार्यकर्ते भारत सोनार यांनी रुबिना बादी आणि तिच्या पतीच्या बँक अकाउंटचे दिल्लीत जाऊन डिटेल्स काढले असता, त्यात तब्बल साडेसहा कोटी रुपये जमा असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या दोघांनी अशाच प्रकारे देशभरात अनेकांना गंडा घातल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसांना बरेच पुरावे देऊनही पोलीस काहीही कारवाई करत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते भारत सोनार यांनी केला आहे. मात्र याबाबत पोलिसांनी बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पोलीस आता तरी लक्ष देऊन आरोपींना पकडतील का, हे पाहावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here